मुंबई - म्हाडाचा महत्वकांक्षी असलेल्या गोरेगाव मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाने गती घेतली आहे. या ठिकाणी ३० हजार कोटी खर्च करून म्हाडाच्या वतीने मायक्रो सिटी उभारण्यात येणार आहे. यामध्ये निवासी वसाहतींसह परवडणारी घरे तसेच रुग्णालय, वृद्धाश्रम, महिलांसाठी हॉस्टेल इमारतीही उभारल्या जाणार आहेत.
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात या प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे. मोतीलाल नगर १४२ एकरावर वसलेले आहे. या ठिकाणी ३ हजार ६२८ खोलीधारक आहेत. या नगराचा पुनर्विकास करून १८ हजार घरांची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडा सभापती मधु चव्हाण यांनी दिली.
मोतीलाल नगरमध्ये पुनर्विकासातून सर्व सुविधांनी सज्ज असलेले छोटे शहर उभारण्याचा म्हाडाचा मानस आहे. त्यासाठी म्हाडाने यापूर्वीच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची (पीएमसी) नियुक्ती केली आहे. या प्रकल्पामुळे अद्ययावत मायक्रो सिटी उभे राहण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे या पुनर्विकासात रहिवाशांना संक्रमण शिबिरात जावे लागणार नाही, त्यांना थेट नव्या इमारतीत राहता येणार आहे.
या प्रकल्पाचे संपूर्ण नियोजन म्हाडाकडून केले जाणार आहे. सर्वसामान्यांचे मुंबईतील घराचे स्वप्न पूर्ण होण्यास हा प्रकल्प मदतशीर ठरवणार आहे. या प्रकल्पात परवडणाऱ्या घरांना स्थान देण्यात आले आहे. येत्या सप्टेंबरमध्ये या प्रकल्पासाठी निविदा मागवल्या जातील आणि ऑक्टोबरमध्ये प्रकल्पाची पायाभरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केली जाणार आहे.