मुंबई : कोल्हापूरमधील कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात मनीलाॅंड्रींग कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ईडी तपास करीत आहे. ईडीने मुश्रीफांच्या घर, कार्यालयावर छापेमारी केल्यानंतर त्यांना ईडीच्या मुंबईतील कार्यालयात चाैकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मुश्रीफांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर मुश्रीफ हे दोनवेळा ईडीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशीला हजर राहिले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांची पुन्हा चौकशी : मुश्रीफांना शुक्रवारी पुन्हा चाैकशीला बोलावण्यात आले. त्यानुसार ते वकिलांसोबत चाैकशीला हजर राहणार असल्याची माहिती मिळते. मुश्रीफ यांच्याविरोधात दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने वस्तुस्थितीचा खुलासा करण्यासाठी आणि स्पष्टीकरण देण्यासाठी कागलमधील हजारो शेतकरी गुरुवारी ईडीच्या मुंबई कार्यालयात दाखल झाले होते. त्यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आमदार हसन मुश्रीफांकडे आठ तास कसून चाैकशी : माजी ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ हे बुधवारी दुपारी साडेबारा वाजता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) बॅलार्ड पियर येथील कार्यालयात चौकशीला हजर राहिले होते. त्यावेळी हसन मुश्रीफ यांना 40 प्रश्न विचारण्यात आले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल आठ तास त्यांची कसून चाैकशी केली होती. दरम्यान, ईडी चाैकशीला हजर राहताच मुश्रीफांनी ईडीला एक पत्र दिले होते. या मागण्या मान्य करण्यात आल्या असून, मुश्रीफांचा जबाब सीसीटीव्हीच्या मार्फत ऑडिओ-व्हीडिओ रेकॉर्डिंगमध्ये होत असल्याची माहिती मुश्रीफांच्या वकिलांनी दिली आहे.
ईडीने बजावले होते समन्स : मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने मुश्रीफ यांना समन्स बजावले होते. साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने हे समन्स बजावले होते. मुश्रीफ यांना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास समन्स बजावण्यात आले.
पहाटेच टाकला होता छापा : हसन मुश्रीफ यांच्यावर गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा ईडीने छापे टाकले आहेत. यामुळे हसन मुश्रीफांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगितले जाते. मागील आठवड्यातच ईडीच्या पथकाने हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी छापा टाकला होता. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या कारवाईचा कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध करण्यात आला होता.
हेही वाचा : Farooq Abdullah On BJP : राम फक्त हिंदूंचा देव नाही, सर्वांचा आहे - फारुख अब्दुल्ला