मुंबई : ईद आणि रक्षाबंधन हे दोन्ही मोठे सण नुकतेच साजरे झाले. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आहे तिथेच राहत सण साजरे करणाऱ्यावर अनेकांनी भर दिला. त्यात रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी तर हे सण साजरे करणे दुरचीच गोष्ट. पण बीकेसी कोविड सेंटरमधील 27 लहान कोरोना रुग्णांनी मात्र मोठ्या उत्साहात ईद आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण साजरे केले. धमाल-मजा-मस्ती करत या सणाचा आंनद लुटणाऱ्या या मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य बीकेसीतील डॉक्टरांनाही आनंदीत करून गेले.
मानखुर्द, चिल्ड्रन होम्समधील 29 मतिमंद मुलांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यानंतर यातील 2 मुलांना तत्काळ सायन रुग्णालयात तर 27 मुलांना बीकेसी कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले. ही मुले विशेष असल्याने त्यांची विशेष काळजी घेणेही तितकेच गरजेचे झाले. त्यामुळे सेंटरने या मुलांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करत त्यांच्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर, स्वतंत्र अटेंडेन्स नियुक्त केले. तर, त्यांच्यावर खेळाच्या माध्यमातूनही उपचार करत त्यांचे मनोबल वाढवले जात आहे. दरम्यान आता या 27 ही मुलांची तब्येत एकदम ठणठणीत असून आजच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल उद्या येईल अशी माहिती बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ राजेश डेरे यांनी दिली आहे. तर, ही मुले कोरोनामुक्त झाल्यास त्यांना 14 दिवस क्वारंटाइन केले जाईल. त्यांना कुठे क्वारंटाइन करायचे हे लवकरच ठरवले जाईल असेही डॉ. डेरे यांनी सांगितले आहे.
दरम्यान कोरोनाग्रस्त असूनही, कोविड सेंटरमध्ये ही मुले नेहमीप्रमाणेच आपले आयुष्य जगताना दिसत आहेत. मजा-मस्ती करत राहणाऱ्या या मुलांनी नुकतीच ईद आणि त्यानंतर रक्षाबंधन ही मोठ्या उत्साहात साजरे केले आहे. एम वॉर्डमधील या मुलांना डॉक्टर-नर्सेसनी आणि अटेंडेन्सनी राख्या बांधल्या. मिठाई वाटत सर्व मुलांचे तोंड गोड करण्यात आले. यावेळी इतर रुग्णांनाही राखी बांधण्यात आली, तेव्हा अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. पण कोरोनाग्रस्त म्हणून उपचार घेताना, एका वेगळ्या मानसिकतेत असताना अचानक असा एक क्षण आनंदाचा आल्याने अनेक रुग्णांच्या डोळ्यात यावेळी पाणी आल्याचे डॉ. डेरे सांगतात. रक्षाबंधनाआधी एम वॉर्डमध्ये डॉक्टर-नर्स यांनी या 27 मुलांबरोबर ईदही साजरी केली. एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत मुलांबरोबर वेळ घालवत ईद साजरी करण्यात आली.
स्वतंत्र बालरोग विभाग -कक्ष
मुंबईतील कोरोना रुग्णांवर आता मोठ्या कोविड सेंटरमध्येच उपचार करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. अशावेळी रुग्णांमध्ये लहान मुलांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. तेव्हा लहान रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष-विभाग असणे गरजेचे आहे, असे म्हणत येथे 40 खाटांचे बालरोग कक्ष तयार करण्यात येत आहे. हे काम येत्या दोन दिवसात पूर्ण होईल, अशी माहितीही डॉ. डेरे यांनी दिली आहे. नवजात बालके वगळता इतर बालकांवर येथे उपचार केले जाणार आहेत. यासाठी डॉक्टरांची वेगळी टीमही सज्ज करण्यात आल्याचे डॉ. डेरे यांनी यावेळी सांगितले.