मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकजण घरात बसून आहेत. या काळात प्रत्येकाला सामाजिक-आर्थिक समस्येच्या चिंतेने ग्रासले आहे. यातच मुंबईकरांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्येही वाढ झाल्याचे दिसत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टला एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या मानसिक हेल्पलाइन क्रमांकावर सप्टेंबरपर्यंत 16 हजार 700 कॉल आले आहेत.
कोरोनादरम्यान मानसिकदृष्ट्या समस्या निर्माण होऊ नये, नागरिकांना समुपदेशन करता यावे, म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टने एप्रिलमध्ये 1800120820050 हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केला होता. त्यावर दररोज सरासरी 100 कॉल आले आहेत. बहुतेक कॉल चिंता, नैराश्य, झोपेच्या समस्या आणि इतरांमधील नातेसंबंधातील समस्यांविषयी आहेत. एप्रिलमध्ये या हेल्पलाइनवर 11 हजार 932 कॉल प्राप्त झाले, जे हळूहळू कमी होऊ लागले होते. मे महिन्यात 1 हजार 879 कॉल रेकॉर्ड केले, जे पुढच्या महिन्यात 971 वर आले. तर, जुलैमध्ये 671 कॉल नोंदवण्यात आले जे ऑगस्टमध्ये 600 पर्यंत कमी झाले. मात्र, सप्टेंबरमध्ये ही संख्या थोडीशी वाढून 650 वर गेली आहे.
यात आलेले बहुतेक कॉल हे 26 ते 40 वयोगटातील तरुणांचे आहेत. नोकरी गमावणे आणि लॉकडाऊनमधील कुटुंब आणि पती-पत्नी यांच्याशी जुळवून घेण्याची समस्या ही त्यांची मुख्य चिंता आहे. कॉल करणार्यांपैकी जवळपास 70 टक्के पुरुष आणि 30 टक्के महिलांचा समावेश आहे. दुपारी 3 ते 8 दरम्यान सर्वाधिक कॉल येतात, असे हेल्पलाइनचे प्रमुख सल्लागार दिलशाद खुराणा यांनी सांगितले.
कोरोना दरम्यान करण्यात आलेल्या देशव्यापी टाळेबंदीत, हजारो ऑफिस कर्मचाऱ्यांनी नोकर्या गमावल्या आहेत. महिला किंवा किशोरवयीन मुलींना लग्नासाठी भाग पाडले गेले. कंपन्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त दबाव आणत आहेत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबद्दल चिंता आहे. दिवसेंदिवस या चिंतेची यादी वाढतच चालली आहे.
हेही वाचा - आता कुलब्यावरून थेट कांजूर अन् अंधेरी-वर्सोव्याला पोहचा, मेट्रो 3-मेट्रो 6 मार्ग एकमेकांशी जोडण्याची घोषणा