मुंबई - पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या मेहुल चोक्सीच्या विरोधात ईडीकडून कारवाई करण्यात आली. मेहुल चोक्सी याची मुंबईतील 14 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. मुंबईच्या गोरेगाव परिसरातील 1 हजार 460 स्क्वेअर फुटांचा एक फ्लॅट, सोन्या-प्लॅटिनमचे दागिने, हिरे, चांदी, काही मौल्यवान मूर्ती, महागडे घड्याळ, मर्सिडीज बेंझ गाडी या बाबींचा जप्त केलेल्या गोष्टींमध्ये समावेश आहे.
पंजाब नॅशनल बँकेला 14 हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या निरव मोदी व मेहुल चोक्सी यांच्याविरोधात फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून कारवाई केली जात आहे. ईडीकडून यासंदर्भात निरव मोदीच्या विरोधात कारवाई करण्यात आली. दरम्यान, निरव मोदीची बहिण व तिचा पती यांनी विशेष न्यायालयामध्ये याचिका दाखल करत निरव मोदीपासून आम्हाला दूर ठेवण्यात यावे. यासाठी आम्ही सर्व प्रकारची मदत तपास यंत्रणांना करण्यासाठी तयार आहे. या संदर्भातील महत्त्वाचे पुरावे देण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी विनंती केली आहे. नीरव मोदीची बहीण पूर्वी मेहता व तिचा पती मयांक मेहता यांनी ही याचिका ईडी विशेष न्यायालयामध्ये दाखल केली आहे.
निरव मोदीमुळे व्यावसायिक व खासगी आयुष्यात तणाव -
पूर्वी मेहता हिच्याकडे बेल्जियमचे नागरिकत्व असून तिच्या पती मयांककडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. त्यांनी केलेल्या याचिकेमध्ये, निरव मोदी प्रकरणामुळे त्यांच्या व्यावसायिक व खासगी आयुष्य तणावाखाली आल्याचे त्यांनी म्हटलेले आहे. निरव मोदीकडून करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात ईडीकडून तपास केला जात आहे. यातील दोन प्रकरणांमध्ये आपण पुरावे देऊन मदत करू शकतो, असे मेहता दाम्पत्याने याचिकेत म्हटले आहे.
पूर्वी मेहता व मयांक मेहता आहेत सह आरोपी -
निरव मोदी आणि इतर व्यक्तींच्या विरोधात सीबीआय व ईडीकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निरव मोदीच्या विरोधात 6 हजार 498 कोटी रुपयांच्या घोटाळा नोंदवण्यात आलेला आहे. पंजाब नॅशनल बँकेची तब्बल 6 हजार 498 कोटी रुपयांची फसवणूक नीरव मोदीने केली आहे. पूर्वी मेहता व मयांक मेहता यांना सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपी दाखवण्यात आलेले नाही. मात्र, ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये या दोघांना सह आरोपी दाखवण्यात आले आहे.