मुंबई - राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलकडून 14 व 15 मार्च रोजी घेण्यात आलेल्या एमबीए, एमएसएसच्या या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (एमबीए, एमएमएस-सीईटी-2020) निकाल जाहीर झाला आहे. यात शशांक चंद्रहार प्रभू हा विद्यार्थी 159 गुण मिळवून राज्यात पहिला आला आहे. त्याला पर्सेंटाईल 99.99 टक्के इतके आहे. तर यंदाच्या या निकालात प्रचंड मोठ्या प्रमाणात गुणांची घसरण झाल्याचे समोर आले असून केवळ चार विद्यार्थ्यांना 150हून अधिक गुण मिळाले आहेत. मागील वर्षी ही संख्या 20पर्यंत होती.
या सीईटीसाठी देशभरातून अर्ज भरले जातात. राज्यातून तब्बल 1 लाख 24 हजार 236 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, परीक्षेला 1 लाख 10 हजार 631 विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा राज्यातील 135 आणि राज्याबाहेरील 13 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती.
या परीक्षेत मागील वर्षांच्या तुलनेत गुणांची टक्केवारी घसरली असल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी 151 ते 175 या दरम्यान गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही केवळ 20 होती, यंदा ही संख्या 4वर पोहोचली आहे. तसेच 126 ते 150 या दरम्यान गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले आहे. मागील वर्षी केवळ 677 विद्यार्थ्यांचा समावेश होता. तर, आता ही संख्या 392वर येऊन पोहोचली आहे. तर दुसरीकडे 51 ते 100 आणि 0 ते 50 गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र वाढली असल्याचे दिसून आले आहे.
राज्यभरात उच्च व तंत्रनिकेतन शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयांमध्ये एमबीए आणि एमएमएसच्या सुमारे 36 हजार 765 जागा असून त्यावर गुणवत्तेनुसारच प्रवेश होणार आहेत. त्यातच यंदा एमबीए, एमएमएस प्रवेशासाठी अखिल भारतीय उमेदवारी प्रकारात राज्य सरकारची ‘सीईटी’, ‘सीमॅट’ आणि राष्ट्रीय स्तरावर होणारी ‘कॅट’ परीक्षा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात एमबीए, एमएमएस अभ्यासक्रमासाठी इतर कोणतीही खासगी व्यवस्थापनाची प्रवेशपरीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नसल्याचे सीईटी सेलने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले आहे.