मुंबई - मुंबई महापालिकेत सॅप प्रणालीत हस्तक्षेप करीत कर्मचारी काही निवडक कंत्राटदारांना मदत करीत असल्याचा आरोप करत, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी एका निनावी पत्राद्वारे करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत आलेल्या निनावी पत्राने खळबळ उडाली असून प्रशासन आणि कंत्राटदारांची झोप उडाली आहे. मात्र, असे पत्र आल्याची माहिती आपल्याला नसल्याचे महापौर किशोरी पेडणेकर व विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सांगितले.
कर्मचारी, कंत्राटदार रॅकेट चव्हाट्यावर
मुंबई महापालिकेत प्रशासनातील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप नेहमीच करण्यात येतो. त्यात आता एक निनावी पत्र महापालिका आयुक्त, सर्व अतिरिक्त आयुक्त, आयटी विभाग प्रमुख, सर्व विभागांचे प्रमुख अभियंता, सर्व राजकीय पक्षांचे गटनेते आणि मुंबई पोलीस यांना पाठवण्यात आले आहे. या पत्रात सॅप प्रणालीत हस्तक्षेप करीत महापालिका कर्मचारी काही निवडक कंत्राटदारांना मदत करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा - विखारी वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानीला तातडीने अटक करा - चंद्रकांत पाटील
महापालिकेच्या आयटी विभागाचे कर्मचारी, सॅप कंपनीचे कर्मचारी आणि कंत्राटदार यांचे रॅकेट चव्हाट्यावर आणण्याचा निनावी पत्राद्वारे प्रयत्न करण्यात आला आहे. या निनावी पत्राद्वारे तक्रारदाराने चौकशीची मागणीही केली आहे. यामुळे प्रशासन या निनावी पत्राची दखल घेणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ठराविक कंपनींना काम
मुंबई महापालिकेत 28 जानेवारीला एक पत्र आले. त्यात तीन कंत्राटदार कंपन्यांच्या निविदा पद्धतीबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्रात तक्रारदाराने आयटी विभागाचे कर्मचारी आणि सॅप कंपनीचे कर्मचारी यांच्याबाबत शंका उपस्थित केली आहे. काही कंत्राटदार आयटी विभागातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कंत्राट कामातील अन्य कंत्राटदारांनी भरलेल्या निविदेतील बोली जाणून घेत स्वतः कामाची कमी बोलीची निविदा भरत कामे मिळवतात, अशी धक्कादायक माहिती या पत्राद्वारे समोर आली आहे. तक्रारदाराने ठराविक कंपनींना कशाप्रकारे कामे मिळत असल्याची जंत्रीच सादर केली आहे.
हा घोटाळा गाजले होते
काही वर्षांपूर्वी पालिकेत रस्ते घोटाळा उघडकीस आला होता. एका कंत्राटदाराने तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांच्याकडे तक्रार केल्यावर चौकशी मधून रस्ते कामात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. त्यात सुमारे दोनशे अभियंत्यांवर, कंत्राटदारांवर कारवाई झाली होती. पालिकेच्या सॅप प्रणालीच्या लॉगिन आणि पासवर्डचा वापर करून कंत्राटदार इतर कंत्राटदारांनी भरलेली रक्कम जाणून घेऊन आपल्या कामाची बोली कमी लावत असल्याचा प्रकार या आधीही उघडकीस आला होता.
असे पत्र आल्याची माहिती नाही
या पत्राबाबत मी ऐकले आहे, मात्र असे पत्र मला आलेले नाही, अशी माहिती पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली. तर, असे पत्र आले म्हणून मी ऐकते आहे. आम्हाला पत्र आलेले नाही. असा काही प्रकार सुरू असेल असे वाटत नाही, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
हेही वाचा - अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी खास तरतूद असणार - राजेश टोपे