मुंबई- महापालिकेच्या सायन रुग्णालयात कोरोना मृतदेहांच्या बाजूलाच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी सायन रुग्णालयाला भेट दिली. या भेटीनंतर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांची लवकरच विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याने याबाबत राज्य शासनाशी चर्चा सुरू आहे. याबाबतचा धोरणात्मक निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका लवकरच घेणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.
हेही वाचा- लाॅकडाऊन: मुंबईहून मध्यप्रदेशकडे पायी निघालेल्या महिलेची नागपुरात प्रसूती...
महापालिकेच्या सायन रुग्णालयात कोरोना मृतदेहांच्या बाजूलाच काही रुग्णांवर उपचार सुरू असल्याबाबतचा एक व्हिडिऔ प्रसारमाध्यमातून प्रसारित झाला होता. व्हिडिओ महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी बघितल्यानंतर त्याची गंभीर दखल घेतली. महापौरांनी आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांच्यासह सायन रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांच्याशी चर्चा करुन या प्रकरणाची चौकशी समिती नेमणार असल्याचे महापौरांनी सांगितले. अशा घटना यापुढे घडू नये व अशा प्रसंगी मृत व्यक्तीचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास पुढे आले नाही तर महापालिकेने मृतदेहाची विल्हेवाट लावायची का? याबाबत महानगरपालिका धोरण निश्चित करणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.
त्याचप्रमाणे कोरोना बाधित मृतदेहाची विल्हेवाट अर्ध्या तासात लावण्याचे मार्गदर्शक तत्त्वे असून याबाबत डॉ. इंगळे यांनी कमिटीची स्थापना केली आहे. त्यावर ते काम करत असल्याचे महापौरांनी सांगितले. वार्डमधून कोरोनाबाधित मृतदेहाची विल्हेवाट लवकर लागावी यासाठीही हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा मार्गदर्शक सूचना लवकरच निश्चित करणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. कोरोनाचे मृतदेह वेगळे ठेवण्याची व्यवस्था शवगृहात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती महापौरांनी यावेळी दिली. तसेच कोरोनाचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांना कळविल्यानंतरही दोन तासात जर ते आले नाही तर याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे महापौरांनी सांगितले.