मुंबई - पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा आम्ही कधीही केला नाही, करणारही नाही पण पाणी तुंबणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. तर पाणी तुंबण्याच्या समस्येची तीव्रता कमी होईल, अशी ग्वाही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली आहे.
नालेसफाई पाहणी
मुंबईत दरवर्षी पावसाळ्या पूर्वी आणि पावसाळ्या दरम्यान नालेसफाई केली जाते. नालेसफाई केल्यानंतरही पावसाळ्यात मुंबईत पावसाचे पाणी तुंबल्याचे प्रकार समोर आले आहेत. पाणी तुंबल्याने मुंबई महापालिकेवर अनेक वेळा टीकाही झाली आहे. यामुळे नालेसफाई कशी केली जाते याची पाहणी दरवर्षी केली जाते. आज (मंगळवार) पेडणेकर यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या उपस्थितीत पश्चिम उपनगरातील नालेसफाईची पाहणी केली आहे.
नालेसफाईच्या पाहणीदरम्यान महापौर पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना नालेसफाईचे काम 22 फेब्रुवारी पासून सुरू आहे. आतापर्यंत 70 ते 80 टक्के नालेसफाईचे काम झाले आहे. कोरोना स्थिती असली तरी कामे सुरू आहेत. येणाऱ्या पावसाळ्यात दिलासा मिळेल, मुंबई सात बेटाची आहे त्यामुळे पाणी तुंबणार नाही असे म्हणणार नाही, पाणी भरले तरी पाण्याचा निचरा लगेच होतो. पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा आम्ही कधी केला नाही, करणारही नाही पण पाणी तुंबणार नाही याची काळजी घेत आहोत, असे यावेळी महापौरांनी सांगितले.
'पाणी तुंबण्याच्या समस्येची तीव्रता कमी होईल'
कोरोनाकाळातदेखील पालिकेचे नालेसफाईचे काम सुरुच आहे. आम्ही ७० ते ८० टक्के काम पूर्ण केले आहे. सत्ताधारी म्हणून आमची जबाबदारी आहे. आम्ही नालेसफाई व्यवस्थित करु पाणी तुंबण्याच्या समस्येची तीव्रता कमी होईल, अशी ग्वाही यशवंत जाधव यांनी दिली आहे.
हेही वाचा -मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह पोस्ट, पुण्यातून भाजपचा कथित कार्यकर्ता ताब्यात