मुंबई Vice President Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे सोमवारी (27 नोव्हेंबर) एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर होते. श्रीमद राजचंद्र यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबईतील चर्नी रोड स्टेशनजवळ निर्माण करण्यात आलेल्या श्रीमद राजचंद्र स्मारकाचे उद्घाटन उपराष्ट्रपती धनखड यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईत निर्माण करण्यात आलेले स्मारक जनतेसाठी प्रेरणास्पद ठरेल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी याप्रसंगी बोलताना केलं. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते ऑपेरा हाऊसच्या मागच्या 'मॅथ्यू रोड'चं नामकरण (Mathew Road Renamed) 'श्रीमद राजचंद्र मार्ग' (Shrimad Rajchandra Marg)असं करण्यात आलंय.
नामकरणावरुन झाला होता वाद : दक्षिण मुंबईमधील मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील ऑपेरा हाऊस परिसरातील मॅथ्यू मार्गाचं श्रीमद राजचंद्र मार्ग असे नामकरण करण्याचा घाट याआधीही घालण्यात आला होता. या नामकरणाला गिरगावकरांकडून विरोध करण्यात आला होता. दक्षिण मुंबईमधील अनेकांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यामुळं त्यापैकी एकाचं नाव या रस्त्याला द्यावं अशी मागणी जोर धरू लागली होती. मात्र, आता या मार्गाचं नामकरण करण्यात आलंय. यावेळी मात्र स्थानिकांनी विराध केला नसल्याचं पाहायला मिळालं.
भारत हा संस्कृतीचा केंद्रबिंदू : याप्रसंगी बोलताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं अध्यात्मिक गुरु राहिलेले श्रीमद राजचंद्र हे याच आकाशगंगेतील थोर महापुरुष होते. संपूर्ण जगात भारत हा संस्कृतीचा केंद्रबिंदू असून देशात वेळोवेळी जन्मलेल्या संत, महंत व महापुरुषांनी या भूमीला पवित्र केलंय. तसेच 'आत्मकल्याण दिवस' कार्यक्रमात बोलताना, 'श्रीमद राजचंद्र मिशन' ही संस्था जनसामान्यांची सेवा, तसेच पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या माध्यमातून पशुपक्ष्यांचं औषधोपचार हे दैवी कार्य करत असल्याबद्दल धनखड यांनी संस्थेचं कौतुक केलंय.
सदस्यांनी गुरुदेवश्री राकेशजी यांचं प्रवचन ऐकावं : मिशनचे अध्यात्मिक प्रमुख गुरुदेवश्री राकेशजी आपल्या प्रवचन व सेवाकार्यातून जगात शांतता व सेवेचा संदेश देत असल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. संसदेच्या सभागृहात चर्चा व विचार विनिमय होण्याऐवजी गदारोळ व कटुता निर्माण होत असल्याबद्दल खंत व्यक्त करताना संसद सदस्यांनी गुरुदेवश्री राकेशजी यांचं प्रवचन ऐकलं तर त्याचा सकारात्मक परिणाम होईल, असं धनखड यांनी सांगितलं.
श्रीमद राजचंद्र एक यशस्वी उद्योजक : याप्रसंगी बोलताना राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, महात्मा गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनामध्ये श्रीमद राजचंद्र यांच्या विचारांचा प्रभाव हा समानतेचा धागा आहे. श्रीमद राजचंद्र एक यशस्वी उद्योजक होते. संसाराचा त्याग करून त्यांनी आत्मकल्याणाचा प्रशस्त मार्ग निवडला. त्यांच्या नावानं कार्यरत असलेले श्रीमद राजचंद्र मिशन मानवतेची उत्कृष्ट सेवा करत आहेत, असंही बैस म्हणाले.
शांततेचा मार्ग प्रशस्त करेल : श्रीमद राजचंद्र हे शतावधानी होते. त्यांची महात्मा गांधी यांच्याशी पहिली भेट मुंबई येथे झाली होती, असेही राज्यपालांनी सांगितलं. समाजातील एक मोठा वर्ग उपेक्षित व अभावग्रस्त जीवन जगताना दुसरा वर्ग ऐशोआरामात जगत असेल तर कुणीही शांतीनं राहू शकणार नाही, असं सांगून गरीब व अभावग्रस्त लोकांचा विचार शांततेचा मार्ग प्रशस्त करेल, असंही राज्यपाल म्हणाले.
'श्रीमद राजचंद्र मार्ग' : यावेळी गुरुदेवश्री राकेशजी यांनी उपराष्ट्रपतींना 'जनकल्याण हितेशी' पुरस्कारानं सन्मानित केलं. उपराष्ट्रपतींच्या हस्ते ऑपेरा हाऊसच्या मागच्या 'मॅथ्यू रोड'चं नामकरण 'श्रीमद राजचंद्र मार्ग' असं करण्यात आलंय. कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूरचे अध्यात्मिक प्रमुख गुरुदेवश्री राकेशजी, श्रीमद राजचंद्र मिशनचे अध्यक्ष अभय जेसानी, उपाध्यक्ष आत्मप्रीत नेमी व निमंत्रित उपस्थित होते.
हेही वाचा -