मुंबई : देशभरात पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सज्ज झाली असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सर्व रुग्णालय आणि पालिका कार्यालयात मास्क लावावे असे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिले आहेत.
आढावा बैठक : राज्यात गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतही रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी एक आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमी चर्चा करण्यात आली. महापालिकेचे रुग्णालय खासगी रुग्णालय या ठिकाणच्या खाटा सज्ज ठेवण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी या बैठकीमध्ये दिले.
मास्क लावा : कोरोना विषाणूचा प्रसार विशेष करून ६० वर्षावरील नागरिकांमध्ये अधिक प्रमाणामध्ये दिसून येतो. या वयोगटातील नागरिकांना अनेक इतर आजार असतात. त्यामुळे या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मास्कचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये तसेच रुग्णालयांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने मास्क वापरावे अशी विनंती आयुक्तांनी केली आहे. तसेच मुंबईमध्ये कोरोना पसरल्यास मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सामुग्री लागते. औषधे इंजेक्शन लागतात. सर्व रुग्णालयांमध्ये किती ग्लोव्ह्ज, मास्क, पीपीई किट, औषध साठा, वैद्यकीय सामग्री लागेल याचा आढावा घेऊन त्याची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
चाचण्या वाढवा : कोरोना रुग्ण शोधून काढण्यासाठी संशयित रुग्णांच्या चाचण्या करणे महत्त्वाचे असते. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या चाचण्या वाढवून रुग्णांचा शोध घेऊन प्रसार रोखा, रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणाऱ्या सर्व रुग्णांची कोविड चाचणी करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांमध्ये जागृती करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी, रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. ऑक्सिजन लावावे लागणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे, हात सतत स्वच्छ धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.