मुंबई - मराठा आरक्षणानंतर मिळाल्यानंतर देखील मराठा क्रांती ठोक मोर्चा सरकारच्या भूमिकेवर समाधानी नाही. आरक्षण मिळाले असले तरी मराठा समाजाच्या अनेक प्रश्न सरकारने प्रलंबित ठेवले आहेत, असा आरोप मराठा समाजातील नेत्यांनी केला आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चातर्फे आपल्या समाजाच्या मागण्या विधानसभेत व राज्यसभेत मांडण्यासाठी, मराठा समाजाचे उमेदवार निवडणुकीत उभे करणार असल्याचे आबा पाटील व केरे पाटील यांनी सांगितले.
गेली 35 वर्षे मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून फक्त राजकीय फायद्यासाठी सर्वच पक्षांनी मराठा समाजाचा वापर केला. केंद्रात आणि राज्यात मराठा लोकप्रतिनिधी समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करत नाहीत. यामुळे ठोक मोर्चाच्या वतीने येणाऱ्या निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मराठा समाजाच्या कित्येक मागण्या सरकारने प्रलंबित ठेवल्या त्यामध्ये कोपर्डी घटनेतील आरोपींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणी झाली नाही. मराठा समाजाला आरक्षण लागू झाले पण सरकारने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी देखील मिळालेला नाही. शिवाजी महाराजांचे स्मारक याबाबत सरकारने भूमिका अंधारात आहे. यामुळेच मराठा समाजातर्फे या प्रलंबित मागण्या आणि मराठा समाजाच्या लोकांच्या मनातील खदखद पाहता, मराठा समाज येणाऱ्या आगामी निवडणुकीत आपला उमेदवार उभा करून, आपली बाजू मांडतील. असे आबा पाटील व केरे पाटील यांनी यावेळी सांगितले तसेच, यावेळी मुख्यमंत्री हा मराठा समाजाचाच होईल या आशयाच्या घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या.