मुंबई- लोकसभा निवडणुकीमध्ये कामकाज करताना अनेक प्रकारच्या चुका झालेल्या आहेत. त्यात दुरुस्ती करण्यासाठी मागील काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये विविध मते समोर आली आहेत. ते विचारात घेऊन सर्वांना खुश कसे करता येईल याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी आज मुंबईत दिली.
मुंबईतील टिळक भवन येथे आज काँग्रेसच्या आढावा बैठकीचा दुसरा दिवस होता. या बैठकीत मुंबई, कोकण आदी भागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी राज्यभरातील कार्यकर्त्यांची नाराजी आज पुन्हा एकदा उफाळून आली. त्यांचे समाधान करताना खरगे यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विविध नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची निवड करताना सामाजिक समतोल कसा राहील यावरही लक्ष दिले जात असल्याची माहिती दिली.
लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात जाऊन प्रचार करणाऱ्या जयकुमार गोरे यांना विधानसभेच्या प्रतोद पदी नियुक्ती दिल्याने याविषयी पदाधिकारी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यावरही पक्षाकडून विधानसभेच्या निवडणुकीचा हवाला देण्यात आला. गरज पडल्यास पक्षविरोधी कारवाया करणार्यांवर कारवाई केली जाईल, असे संकेतही या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
आजच्या बैठकीनंतर खरगे म्हणाले की, आम्हाला सध्या सर्वांना खुश करता येणार नाही, पण सर्वांना सोबत घेऊन सर्वांचे समाधान करायचे आणि पक्षाला मजबूत करायचे आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षाला कोणत्या जागा सोडू शकतो याची चर्चा बैठकीत होत आहे. जिल्हा पातळीवरचे काँग्रेस अध्यक्ष, सेक्रेटरी आणि ब्लॉक अध्यक्ष काम करत नसतील तर त्यांना जाब विचारला जाईल, असेही खरगे यांनी सांगितले. आम्ही आता नवीन विधिमंडळ नेता, गटनेता यांची निवड केली आहे. १७ तारखेला सुरू होणाऱ्या राज्य हिवाळी अधिवेशनात हे नेते आमची ताकद दाखवतील, असेही खरगे यांनी सांगितले.