मुंबई MVA Seat Allotment Meeting in Delhi : काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीतील महत्वाची बैठक आज (9 जानेवारी) दिल्लीत पार पडणार आहे. या बैठकीत शिवसेनेतर्फे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड तसंच काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात सहभागी होणार आहेत.
महायुतीतील तिन्ही पक्षाची शिबीरे सुरू : देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी राज्यातील महायुती जोरदार तयारीला लागलीय. महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) वेगवेगळ्या बैठका, पदाधिकारी-कार्यकर्ते मेळावे, शिबीरं घेण्यावर भर देत आहे. त्यानंतर 14 जानेवारीपासून महायुतीचे मुख्य तीन आणि इतर 11 घटक पक्षांचे संयुक्तिक मेळावे देखील सुरू होत आहेत. त्यामुळं एक प्रकारे लोकसभा निवडणूक पूर्व तयारीत महायुती महाविकास आघाडीपेक्षा सध्या तरी पुढं आहे.
दिल्लीत बैठक : राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. 2019 ला निवडणुकीत भाजपानं 25 जागा लढवत 23 जागांवर विजय मिळवला होता. शिवसेनेला 21 जागापैकी 18 जागांवर विजय मिळवता आला होता. तर काँग्रेस एका जागेवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 4 ठिकाणी विजय मिळाला होता. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानं सध्याची परिस्थिती बदलली आहे. 2019 चा विचार केला तर काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागा लढू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपण 23 जागा लढवणार असल्याचं म्हणत बैठकीपूर्वीच बॉम्ब टाकला आहे. तसंच आजच्या बैठकीला वंचितचे प्रकाश आंबेडकर तसंच राजू शेट्टी उपस्थित राहणार का, हे पाहावं लागणार आहे. तसंच जागा वाटपासंदर्भात मित्र पक्षांशी चर्चा करण्यासाठी काँग्रेसकडून मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यांची समिती तयार करण्यात आलीय.
हेही वाचा -