मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आभासी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेला आम्ही प्रत्यक्ष उत्तर देतो आहोत, असा टोला परिवहनमंत्री अनिल परब यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत लगावला. आभासी पत्रकार परिषदेला आम्ही थेट उत्तर देत आहोत, असेही परब यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेले दावे खोडून काढले. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला बाळासाहेब थोरात यांनी सुरूवात केली. ते म्हणाले, 'कोरोनाचे संकट संपूर्ण जगासह महाराष्ट्रातही आहे. केंद्र सरकारने २५ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केले. या लॉकडाऊनमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली एकत्रित लढा देण्याचे काम राज्य सरकारचे सुरू आहे. महाराष्ट्रात स्थलांतरित मजुरांची संख्याही खूपच मोठी आहे. महाराष्ट्र हे देशाचे व्यवसाय केंद्र आहे. आजही सात लाख लोकांना आपण भोजन देत आहोत. संकटकाळात भाजपाकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा होती. मात्र ते या परिस्थितीचा फायदा घेऊन राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.'
बाळासाहेब थोरात यांच्यानंतर अनिल परब यांनी फडणवीसांच्या दाव्याला आकडेवारीसह उत्तर दिले. ते म्हणाले, 'केंद्राने महाराष्ट्राला गहू, तांदूळ आणि डाळ यांची मदत केली. १७५० कोटींचे गहू आम्हाला देण्यात आला आहे, असे फडणवीस म्हणतात. त्यांचा हा दावा खोटा आहे. कारण हे गहू अद्याप महाराष्ट्राला मिळालेले नाहीत. स्थलांतरित मजुरांसाठी केंद्राने पॅकेज दिल्याचे फडणवीस म्हणाले. पण पैसे देण्याचा निर्णय तर चार दिवसांपूर्वीच झाला आहे.'