मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. धार्मिक सणानंतर पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 5 हजार 760 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 4 हजार 88 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 17 लाख 74 हजार 455 झाला आहे. एकूण मृतांची संख्या 46 हजार 573 वर पोहचली आहे. राज्यात आतापर्यंत 16 लाख 47 हजार 4 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. तर 79 हजार 873 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 92.82 असून मृत्यू दर हा 2.62 आहे.
दिवाळीनंतर मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मुंबईत गेल्या पाच दिवसात रुग्ण संख्येत दुप्पटीहून अधिक वाढ झाली आहे तर राज्यातही रुग्णांचा संख्येत वाढ पाहायला मिळत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही १५ दिवस मुंबईत येणाऱ्या मेल एक्स्प्रेस व लांब पल्ल्याच्या ट्रेन बंद करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने -
मुंबई आणि राज्यात वाढणारी रुग्णांची संख्या पाहता मुंबई, ठाणे आदी जिल्ह्यात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ट्रेन आणि विमान सेवा बंद करण्याची मागणी पुढे आला आहे. यावरून कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी रुग्ण संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई आणि मुंबई बाहेरून येणाऱ्या गर्दीवर निर्बंध घातले जाणार आहेत. यावरून महाराष्ट्र आणि मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
रुग्ण संख्या कधी किती -
राज्यात जून दरम्यान दिवसाला 5 हजार 400 रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्या 10 हजार 500 वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या 10 हजार 400 वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या 24 हजार 800 वर गेली होती. तर 12 ऑक्टोबरला 7 हजार 89 रुग्ण, 13 ऑक्टोबरला 8 हजार 522 रुग्ण आढळून आले होते. 19 ऑक्टोबरला 5 हजार 984 रुग्णांची, 26 ऑक्टोबरला 3 हजार 645, 7 नोव्हेंबरला 3 हजार 959, 10 नोव्हेंबरला 3 हजार 791, 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 16 नोव्हेंबरला 2 हजार 535 तर 17 नोव्हेंबरला 2 हजार 840 रुग्ण आढळून आले आहेत. तर आज पुन्हा 5 हजार 760 रुग्णांची नोंद झाली आहे.