मुंबई - आपण अजूनही प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. दिल्ली भेटीत प्रदेशाध्यक्ष बदला बाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र, जर पक्षश्रेष्ठींना वाटत असेल आणि ते तरूण नेत्याला संधी देणार असतील तर नक्कीच राजीनामा देण्याची आपली तयारी असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले आहे. थोरात राजीनामा देणार अशा बातम्या गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तूळात चर्चील्या जात होत्या. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
थोरातांचा दिल्ली दौरा
बाळासाहेब थोरातांनी नुकताच दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात ते प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार ही चर्चा होती. मात्र ही चर्चा थोरात यांनी फेटाळून लावली आहे. आपण अजून ही प्रदेशाध्यक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. आपण काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे नेते आहोत. शिवाय महसूल मंत्रीही आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी ही आपल्याकडे आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीकडे एवढ्या जबाबदाऱ्या असल्याने अशी चर्चा होवू शकते, असेही त्यांनी सांगितले.
पक्षश्रेष्ठींनी निर्णय घ्यावा
प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे पक्षश्रेष्ठींना वाटत असेल तर त्यासाठी आपली तयारी असल्याचे यापूर्वीच सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय पक्षाला ताकद देईल असा तरूण चेहरा पक्षाने दिल्यास त्याची पक्ष वाढीस मदतच होणार आहे. त्याला आम्ही सर्व जण ताकद देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्यावेळी पक्षश्रेष्ठी सांगतील तेंव्हा आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रभारींबरोबर वाद असल्याचेही फेटाळले
महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या बरोबर थोरात यांचे खटके उडत असल्याचेही वृत्त होते. मात्र हे वृत्त खोटे असल्याचे थोरात यांनी सांगितले. पाटील आणि आपल्यात चांगला समन्वय असल्याचेही त्यांनी सांगितले. या केवळ चर्चा असून त्याला काही अर्थ नसल्याचे ते म्हणाले. पक्ष वाढीसाठी पाटील मेहनत घेत आहेत हे सांगायला ते विसरले नाहीत.
मुंबई काँग्रेसचाही अध्यक्ष बदलला
दोन आठवड्यापूर्वी मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये बदल करण्यात आला आहे. मुंबई प्रदेशचे अध्यक्षपद माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याकडून काढून घेऊन ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार भाई जगताप यांच्यावर सोपवण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील प्रदेशाध्यक्षपदाची संदर्भात बदल केले जातील या चर्चेला उधाण आले होते.
अमित देशमुखांचे नाव चर्चेत
या घडामोडीमध्ये काँग्रेसकडून मागील काही दिवसांमध्ये प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते. तसेच युवक कल्याण व क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या नावाची सुद्धा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा असल्याचेही सांगण्यात येत आहे. तर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हेही या पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.