मुंबई: 2021 साठीचा शालेय शिक्षणाचा अहवाल (School Education Report 2021) प्रसिद्ध झाला आहे. शिक्षण उपलब्धता, प्रवेश, पायाभूत सोयीसुविधा, समानता आणि प्रशासन प्रक्रिया अश्या पाच विषयात कामगिरीवर आधारित क्रमवारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. (Maharashtra rank in education performance).
देशभरातील शालेय शिक्षण यंत्रणांच्या समावेश: शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने आज 2020-21 वर्षासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीवर आधारित प्रतवारी निर्देशांक अहवाल (परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स) प्रसिद्ध केला. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील शालेय शिक्षण यंत्रणांच्या सर्वसमावेशक विश्लेषणाच्या पुराव्यावर आधारित असणारा हा निर्देशांक आहे. या उपक्रमांतर्गत 70 निकषांसाठी 1000 गुणांची तरतूद असून त्यांना परिणाम आणि प्रशासन व्यवस्थापन अशा 2 गटांमध्ये श्रेणींबद्ध करण्यात आले आहे. शिक्षण साधिते, प्रवेश, पायाभूत सोयीसुविधा, समानता आणि प्रशासन प्रक्रिया असे या गटाचे पाच उपगट आहेत.
26.5 कोटी विद्यार्थ्यांना सामावून घेणारी शिक्षण यंत्रणा: सुमारे 14.9 लाख शाळा, 95 लाख शिक्षक आणि विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या सुमारे 26.5 कोटी विद्यार्थ्यांना सामावून घेणारी भारतीय शिक्षण यंत्रणा ही जगातील सर्वात मोठ्या शिक्षण यंत्रणांपैकी एक आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील शालेय शिक्षणाच्या यशापयशाची कामगिरी तसेच यशाबद्दल माहिती आणि डेटा आधारित यंत्रणा प्रदान करण्यासाठी हा निर्देशांक तयार केला आहे. सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी पुराव्यावर आधारित धोरण तयार करणे आणि अभ्यासक्रमातील सुधारणा अधोरेखित करणे हे या निर्दशांकाचे मुख्य उद्दिष्ट आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने आतापर्यंत 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या वर्षांसाठी अशा प्रकारचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. आज प्रसिद्ध करण्यात आलेला अहवाल हा 2020-21 या वर्षासाठीचा आहे.