मुंबई -आम्ही रोज एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चहा प्यायला बसलो तर कार्यकर्त्यांनी का लढावे? शिवसेनेच्या डीएनएमध्ये ढोंगीपणाचे नाट्य नाही. लोकांच्या अस्मितेची लढाई आहे. आम्ही लढणारे आहोत. लोकांमध्ये संभ्रम वाढविणारे भीष्माचार्यासारखे वर्तन नको, असा टोला खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. कार्यकर्ता व मतदारांमध्ये संभ्रम होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. नातीगोती वेगळे व राजकारण वेगळे असायला हवे. शरद पवार आमचे महाविकास आघाडीचे व इंडियाचे नेते आहेत. त्यांची संवादाची भूमिका असते, असेही राऊत यांनी म्हटले. खासदार राऊत हे माध्यमांशी बोलत होते.
एकाच रात्रीत ठाणे जिल्ह्यातील कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १८ रुग्ण दगावले आहेत. ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच जिल्ह्यात मृत्यूचे तांडव निर्माण झाल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. काहीही झाले की उठसूट हेलिकॉप्टरने फिरणारे मुख्यमंत्री आता कुठे आहेत? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा संजय राऊत यांनी केली आहे.
अमित शाह इथे आले असते - संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपचारासाठी महाबळेश्वरला गेले आहेत. मग त्यांच्याच ठाण्यात १८ रुग्ण मेले, त्यांचा आक्रोश आता कुणी ऐकायचा? एरव्ही सतत कुठेही मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाऊन मदत केल्याचे नाटक करतात. परंतु ज्या ठाण्याचे ते प्रतिनिधीत्व करतात तिथे मात्र पोहोचले नाहीत, हे दुर्दैव आहे. येथे इतर कुणाची सत्ता असती व असे झाले असते तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येथे आले असते. शाह यांनी विचारणा केली असती, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
भाजपाचे पोपटलाल कुठे आहेत - भाजपा नेते किरीट सोमैय्या यांचे नाव न घेता संजय राऊत यांनी कडाडून टीका केली. ते म्हणाले, भाजपचे पोपटलाल कुठे आहेत? नेहमी कोविड घोटाळ्यावर बोलणारे या मृत्यूच्या तांडवाबाबत आता जाब का विचारत नाहीत? हा घोटाळा कुणाचा आहे? मुंबई ठाण्यासह १४ पालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आहे. तिथे प्रशासक नेमले आहेत. त्यामुळे कुणाचाही कुणाला थांगपत्ता राहिला नाही. येथे महापालिकेत जर लोकप्रतिनिधींची राजवट असती तर हे टाळता आले असते, असेही राऊत म्हणाले.
राज्याचा कारभार वेड्यांच्या हाती - संजय राऊत पुढे म्हणाले की, यह बात दूर तक जायेगी. नेहमी सत्य ऐकल्यावर त्यांची मानसिक स्थिती बिघडत असते. येथे खोटारड्यांचे राज्य आहे. परंतु सत्य ऐकण्याची त्यांची मनस्थिती नसते. सध्या राज्याचा कारभार हा वेड्यांच्या हाती आहे. हे लोक सत्तेसाठी वेडे झालेले आहेत. सत्तेसाठी वेडे झालेले हे लोक उद्या महात्मा गांधींना, ज्येष्ठ नेत्यांनाही वेडे ठरवतील. आता आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असा इशाराच राऊत यांनी दिला आहे.
सूर्यावर थुंकू नका - खासदार राऊत यांनी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांचे मनापासून कौतुक केले. राहुल गांधी यांची लोकप्रियता देशात आणि जगात वाढत आहे. २०२४ मध्ये राहुल गांधी चमत्कार घडवतील व विरोधी पक्षांची आघाडी जिंकणार आहे, हे सत्य आहे. तुम्ही कितीही सूर्यावर थुंका. परंतु एक व्यक्ती म्हणजे सूर्य नाही. कारण राजकारणात एकाचवेळी अनेक सूर्य तळपत असतात व त्यातून देश घडत असतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
राऊत यांनी कालदेखील राहुल गांधींचे केले होते कौतुक - खासदार संजय राऊत रविवारी म्हणाले, 'रायबरेली, वाराणसी आणि अमेठीची लढाई भाजपसाठी अवघड असणार आहे. जनतेने राहुल गांधींच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवली तर त्या नक्कीच मोदी यांच्या विरोधात विजयी होतील, असा विश्वास आहे. अजित पवार व शरद पवारांच्या भेटीवर विचारले असताना राऊत यांनी मार्मिक टिप्पणी केली. राऊत म्हणाले, की पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होऊ शकते. तर शरद पवार आणि अजित पवार यांची भेट का होऊ शकत नाही?
हेही वाचा