मुंबई : आधी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट आणि आता विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटापासून काँग्रेसमध्ये यामुळे अस्वस्थता आहे. सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेनेही यावर आश्चर्य व्यक्त केले. 'अजित पवारांना मुख्यमंत्री करायचे असेल तर आधी शरद पवारांना अजित पवारांशी हातमिळवणी करावी लागेल', असा दावा वड्डेटीवार यांनी केला. तसेच ही अट इतर कोणी नाही तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच घातली आहे, असेही वड्डेटीवार म्हणाले.
शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना केंद्रात ऑफर : विशेष म्हणजे, एका दिवसापूर्वी ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही असाच दावा केला होता. शरद पवार यांचे मन वळवण्याची जबाबदारी भाजपाने अजित पवारांवर सोपवली असल्याचे ते म्हणाले होते. पृथ्वीराज चव्हाण यांचे एक वक्तव्य माध्यमात आले होते, ज्यानुसार शरद पवार यांना केंद्रीय मंत्री किंवा नीती आयोगात स्थान देण्याची ऑफर आहे. तसेच शरद पवार मंत्री न झाल्यास त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावरही मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. मात्र, या वृत्तांना स्वतंत्रपणे कोणीही दुजोरा दिलेला नाही.
आघाडीतील सहकाऱ्यांमध्ये अस्वस्थता : या सर्व चर्चांबाबत शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडावी, असे आवाहन काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी केले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही असेच वक्तव्य केले. मात्र, त्यांनी त्यांचे म्हणणे थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगितले. 'शरद पवार हे मोठे राजकीय व्यक्तिमत्व आहेत. त्यांना पद देण्याइतपत अजित पवार यांचा राजकीय दर्जा आहे का', असा तिखट सवाल राऊत यांनी केला. 'जी व्यक्ती स्वत: चारवेळा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आहे राहिली आहे, ती या पदासाठी का तळमळत असेल', असाही प्रश्न त्यांनी केला.
शरद पवारांनी ऑफर नाकारली : शरद पवार यांनीही जाहीरपणे ही ऑफर नाकारली होती. भाजपसोबत जाण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे ते म्हणाले. मात्र, राजकारणात कधी कोणती परिस्थिती निर्माण होईल, हे सांगणे अवघड आहे. शरद पवारांबद्दल भाकित वर्तवणे तर त्याहूनही अवघड आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुण्यातील एका गुप्त भेटीवरून हा सर्व गोंधळ उडाला आहे. या भेटीबाबत शरद पवार यांना विचारले असता, त्यांनी ही वैयक्तिक भेट असल्याचे सांगितले. या भेटीनंतर राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीतील सहकारी शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस दोघेही नाराज आहेत.
शिवसेनेची 'सामना'द्वारे टीका : ठाकरे गटाने या बैठकीचे समर्थन केलेले नाही. या बैठकीबाबत जनतेमध्ये संभ्रम असल्याचे शिवसेनेने सामनामध्ये लिहिले. तसेच ही बैठक टाळता आली असती, असेही संपादकीयमध्ये लिहिले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही या बैठकीबाबत शंका व्यक्त केली आहे. गुप्तपणे कोणतीही बैठक घेऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे. ही पक्षासाठी चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. मात्र, शरद पवार यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. मी भाजपासोबत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
'इंडिया' आघाडीची पुढील बैठक मुंबईत : 'इंडिया' आघाडीची पुढील बैठक ३१ ऑगस्ट रोजी मुंबईत होणार आहे. या बैठकीसाठी शरद पवार यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. या बैठकीत इंडियाच्या समन्वयकाच्या नावावरही चर्चा होईल. चर्चेत असलेल्या नावांमध्ये त्यांच्या नावाचाही समावेश आहे. यासोबतच शरद पवार यांनीही भाजपाविरोधात प्रचार सुरू करणार असल्याची घोषणा केली. १७ ऑगस्टपासून ते त्यांच्या रॅलीला सुरुवात करू शकतात. मात्र यादरम्यान ज्या प्रकारचे राजकारण होत आहे, त्यानंतर पवारांचे पुढचे पाऊल काय असेल, याबाबत साशंकता कायम आहे.
हेही वाचा :