मुंबई : 20 जून 2022 रोजी विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुकीनंतर लगेचच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे गायब झाले. त्यानंतर असे कळले की, एकनाथ शिंदे इतर 11 आमदारांसह गुजरातमधील सुरत शहरात गेले आहेत. दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली, मात्र तोपर्यंत आणखी 10 ते 12 आमदार 'नॉट रिचेबल' होते.
एकनाथ शिंदे गुवाहाटीला पोहचले : 22 जून रोजी शिंदे 40 आमदारांसह आसाममधील गुवाहाटी येथे गेले. त्याच दिवशी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी आपण आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची तयार असल्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे वर्षा हे अधिकृत निवासस्थान सोडले आणि त्यांच्या मातोश्री या खाजगी निवासस्थानी दाखल झाले. 23 जून रोजी 37 आमदारांनी शिंदे यांना शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते घोषित केले. 24 जून रोजी शिवसेनेने बंडखोर आमदारांच्या विरोधात याचिका दाखल केली आणि महाराष्ट्र विधानसभेतील उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्याकडे शिंदे कॅम्पच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली. त्यानंतर झिरवाळ यांनी शिवसेना नेत्यांची भेट घेतली तसेच महाराष्ट्राच्या महाधिवक्त्यांची भेट घेऊन त्यांचे कायदेशीर मत मागितले.
विधानसभेच्या उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव आणला : भाजपला पाठिंबा देणाऱ्या दोन अपक्ष आमदारांनी झिरवाळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला. यावर 34 आमदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या. मात्र हा अविश्वास ठराव झिरवाळ यांनी फेटाळला कारण याचिका स्वत: आमदारांनी पाठवण्याऐवजी एका निनावी ई-मेल द्वारे पाठवण्यात आली होती. त्याच दिवशी एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील रणनीती ठरवण्यासाठी गुजरातमधील वडोदरा येथे भेट घेतली. 26 जून रोजी शिंदेंनी उपसभापतींविरुद्ध अविश्वास ठराव नाकारल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. 27 जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलैला पुढील सुनावणी ठेवली आणि डेप्युटी स्पीकर झिरवाळ यांना त्यांच्याविरोधातील अविश्वास ठरावाबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले.
एकनाथ शिंदेंनी फ्लोअर टेस्ट जिंकली : 30 जून रोजी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोर आमदारांच्या मदतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 3 जुलैला नवीन विधानसभा अध्यक्ष्यांच्या निवडीसाठी महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. पहिल्यांदाच आमदार बनलेले भाजपचे राहुल नार्वेकर 164 मतांसह महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवडून आले. त्यांचे विरोधक शिवसेनेचे राजन यांना 107 मते मिळाली. 4 जुलै रोजी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फ्लोअर टेस्ट जिंकली. विधानसभेत त्यांच्या बाजूने 164 मते पडली, तर 99 सदस्यांनी त्यांच्या विरोधात मतदान केले.
पाच न्यायाधीशांचे खंडपीठ : 8 जुलै 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील नव्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले. 11 जुलैला सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर पुढे न जाण्यास सांगितले. 22 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकांचा संदर्भ पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे दिला. 23 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाला 25 पर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले.
दोन्ही गटांना पक्षाचे नाव व चिन्हांचे वाटप : 9 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीचा हवाला देऊन निवडणूक आयोगाने सेनेचे निवडणूक चिन्ह गोठवले. आणि दोन्ही गटांना नवीन चिन्हे निवडण्यास सांगितले. 10 ऑक्टोबरला उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे चिन्ह म्हणून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या तीन चिन्हांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली. आयोगाने उद्धव यांना मशाल चिन्ह आणि 'शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव तर शिंदेंना 'बाळासाहेबांची शिवसेना' व निवडणूक चिन्ह म्हणून 'दोन तलवार आणि ढाल' दिले.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी : 1 नोव्हेंबर 2022 रोजी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने महाराष्ट्राच्या राजकीय संकटाशी संबंधित याचिकांवर 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची बॅच पोस्ट केली. 13 डिसेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने 10 जानेवारी 2023 रोजी सुनावणी ठेवली. दरम्यान 10 जानेवारी 2023 रोजी सुप्रीम कोर्टाने सांगितले की 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी सुरू होईल. 17 फेब्रुवारी रोजी ठाकरे गटाची 7 सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. तसेच पुढील सुनावणी 21 फेब्रुवारी रोजी निश्चित करण्यात आली. 16 मार्च 2023 रोजी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने नऊ दिवसांच्या सुनावणीनंतर आपला निर्णय राखून ठेवला.
हेही वाचा :