मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा उभी फूट पडली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये सामील झाले आहेत. भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्यामध्ये अजित पवार यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. पहाटेचा शपथविधी यशस्वी झाल्यानंतर अजित पवार यांनी आता अचानक दुपारी शपथविधी करून राज्यातल्या जनतेला आणि स्वतःच्या पक्षालाही जोरदार धक्का दिला आहे. अजित पवार यांच्या नाराजीचा फटका अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे.
अजित पवार यांच्या संबंधित सहकारी साखर कारखान्यांवर केंद्रीय यंत्रणांनी दबाव टाकत वाढता ससेविरा लावला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना काही निर्णय घेणे भाग होते. अखेरीस पक्षाबद्दलची नाराजी आणि केंद्रीय यंत्रणांचा वाढता दबाव यातूनच अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला - आनंद गायकवाड, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
अजित पवार का होते नाराज? : अजित पवार हे 2019 पासूनच पक्षावर नाराज आहेत. 2019 मध्ये अजित पवार यांनी पक्षाच्या सांगण्यावरूनच सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी पहाटे जाऊन शपथविधी घेतला. मात्र त्यानंतर शरद पवार यांनी भूमिका बदलत शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांना मान्य नसतानाही शरद पवार यांच्या भूमिकेनुसार मंत्रिपदाचा राजीनामा देऊन शिवसेने सोबतच्या सरकारमध्ये सामील व्हावे लागले.
सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल कार्याध्यक्ष : पक्षामध्ये जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक गट आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दुसरा गट अशी विभागणी झाली. पक्षाची सूत्रे आपल्याकडे असायला हवीत असे सातत्याने अजित पवार यांना वाटत होते. मात्र, जयंत पाटील यांच्याकडून पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली नाहीत. त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा शरद पवार यांनी राजीनामा देत पक्षाची धुरा अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवावी असा निर्णय झाला असताना अचानक शरद पवार यांनी पुन्हा राजीनामा मागे घेतला. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांच्याकडे कार्याध्यक्ष पदाची सूत्रे सोपवली. अजित पवार यांच्याकडे राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे येतील अशी, चर्चा असताना त्याबाबत निर्णय झाला नाही, यामुळे ही अजित पवार नाराज झाले.
केंद्रीय यंत्रणांचा वाढता दबाव : अजित पवार यांच्या संबंधित सहकारी साखर कारखान्यांवर केंद्रीय यंत्रणांनी दबाव टाकत वाढता ससेविरा लावला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना काही निर्णय घेणे भाग होते. अखेरीस पक्षाबद्दलची नाराजी आणि केंद्रीय यंत्रणांचा वाढता दबाव यातूनच अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - Maharashtra Political Crisis : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'तो' दम; राष्ट्रवादीत पडली उभी फूट