मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या सत्तेतील प्रवेशाने राज्यातील राजकीय समीकरण पूर्णतः बदलून गेले आहे. अशातच शिंदे गटातील आमदारांबरोबर भाजपमधील आमदारांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्री सुमारे एक तास नंदनवन बंगल्यावर चर्चा झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
अजित पवारांच्या एन्ट्रीने अनेक प्रश्न उपस्थित : अजित पवार राज्याच्या सत्तेत सामील झाल्याने जागा वाटपाचा तिढा असेल, मंत्रिमंडळाचा विस्तार असेल या सर्वच गोष्टींवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत. अशातच शिंदे गट व भाजप आमदारांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आहे. भाजप आमदारांची मनधरणी करण्यासाठी आज भाजपकडून महत्त्वाची बैठक मुंबईत गरवारे क्लब येथे सायंकाळी ७ वाजता बोलवण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यासोबत भाजपचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
नाराज आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न : राज्यात स्थिर सरकार आणण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांना सोबत घेतले व राज्यात स्थिर व भक्कम सरकार आले. परंतु अशा परिस्थितीमध्ये राजाच्या सत्तेत अचानक झालेल्या अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे भाजप नेतेही बुचकळ्यात सापडले आहेत. वर्षभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार एकीकडे रखडला असताना अजित पवार यांनी सत्तेत येऊन लगेच त्यांच्या आठ मंत्र्यांचा शपथविधीही उरकला. या कारणाने भाजपचे आमदार प्रचंड अस्वस्थ आहेत. मंत्रिमंडळ विस्तार व महामंडळ वाटपामध्ये आपला नंबर लागेल या आशेने असलेले आमदार फार निराश झाले असून, या सर्व नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी आजची बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे.
हेही वाचा -
- Maharashtra Political Crisis : राजेश टोपेंसह सुनील भुसारा यांनी अजित पवारांची घेतली भेट, मनधरणी की गट बदलला?
- Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस 'वर्षा'वरून रात्री उशिरा पडले बाहेर, नवीन राजकीय खलबते
- Uday Samant On MLA Clash : शिंदे गट आमदारांमध्ये चकमक ही अफवाच, उद्याेगमंत्री सावंत यांनी राजीनाम्याचे वृत्तही फेटाळले