मुंबई : महाराष्ट्र राज्यातील राजकारण बदलण्याचा ट्रेंड सुरु झाला असून राष्ट्रवादी उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांसह अजित पवार यांनी शिंदे भाजप सरकार सोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता राज्यात महायुतीचे सरकार कार्यरत असल्याचे अजित पवारांनी सांगून टाकले. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांची भूमिका कोणती असेल, याबाबत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. मंगळवारी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा गटाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार बैठकांचे सत्र असणारा दिवस : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. त्याबद्दलची तयारी गेल्या वर्षभरापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट करत आहे. तिन्ही पक्षांनी आपापल्या लोकसभा मतदार संघनिहाय बैठक देखील घेतल्या आहेत. फक्त जागा वाटपाचा फॉर्मुला बाकी होता. या महिन्यांमध्ये या संदर्भात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक होणार होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे महाविकास आघाडीचे गणित बदलले आहे.
काँग्रेसने ठोकला विरोधी पक्षनेते पदावर दावा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी उचलेल्या पावलामुळे महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडी भक्कम असल्याचे काँग्रेसचे नेते सांगत आहेत. तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकायला काँग्रेसने सुरुवात केली आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज काँग्रेसच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. बैठकीत राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीबाबत चर्चा होणार आहे. काँग्रेस पक्षालाच विरोधी पक्षनेते पद मिळावे यावरही चर्चा होणार आहे. सध्याची राजकीय घडामोडीवर चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर देखील चर्चा होणार आहे.
काकाकडे जावे की दादाकडे, कार्यकर्ते संभ्रमात : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी 5 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक वायबी सेंटर येथे बोलावलेली आहे. या बैठकीसाठी आमदार, खासदार, नेते, जिल्हाध्यक्ष उपस्थित असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उद्या बैठकीचे आयोजन केले आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेते, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष यांनी बांद्रा येथील एमआयटी कॉलेज येथे बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
देवगिरी बंगल्यावर होणार बैठक : बुधवारी होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका होण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादीतून पक्षाचे नाव आमचेच असल्याचा दावा केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. कशा पद्धतीने कायदेशीर लढा द्यायचा यावरती देखील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये खल होणार आहे. देवगिरी बंगल्यावर अजित पवारांच्या उपस्थित आज बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा -