मुंबई - राज्यात कोरोनाच्या दुसरा लाटेमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध अमलात आणले आहेत. गुरुवार रात्री 8 वाजल्यापासून 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुठल्याही गोष्टींना परवानगी नाही. महाराष्ट्र पोलिसांकडून या दरम्यान ई-पास सुरू केले आहेत.
कोरोना संक्रमणामुळे राज्यभरातील वाहतुकीवर निर्बंध आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना रस्त्यावरून जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. याबरोबरच अत्यावश्यक कारणामुळे जर एखाद्या व्यक्तीला इतर जिल्ह्यांमध्ये किंवा परराज्यामध्ये प्रवास करावा लागणार असेल, तर त्याला योग्य कागदपत्रे सादर करून पास मिळवता येणार आहे. यासाठी covid19.mh police.in या संकेतस्थळावर योग्य माहिती दिल्यानंतर प्रवासासाठी ई पास मिळू शकतो. ज्या व्यक्तींच्या मोबाईल फोनमध्ये इंटरनेटची सोय नसेल अशा व्यक्तींना ते राहत असलेल्या परिसरातील पोलीस ठाण्यात जाऊन पास मिळवता येणार आहे.