मुंबई : राज्यातील मोठमोठे उद्योग इतर राज्यात गेले. यावरून विरोधकांनी मध्यंतरी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. विशेष करून या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली होती.
हजारोंना मिळणार रोजगार : आज केंद्र सरकारने महाराष्ट्रात 'पंप स्टोरेज प्रोजेक्ट'च्या (PSP) संदर्भात दोन कंपन्यांशी १३ हजार ५०० मेगावॅटचे करार केले आहेत. या करारामुळे राज्यात जवळपास ७१ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. तर ३० हजारांपेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
'पंप स्टोरेज प्रोजेक्ट' काय आहे? : जगभरात 'रिन्युएबल एनर्जी' क्षेत्रात 'पंप स्टोरेज' ही अत्यंत महत्त्वाची व्यवस्था आहे. ज्यामध्ये दिवसा खालच्या जलाशयातून सोलरच्या माध्यमातून पाणी उचलले जाते आणि वरच्या जलाशयात सोडले जाते. रात्रीच्यावेळी जलाशयातून ते पाणी खाली आणून टर्बाइनच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते. यामुळे २४ तास आपल्याला अपारंपरिक ऊर्जा कमी किंमतीत मिळते. तसेच 'ग्रीड स्टॅबिलाइज' करण्यासाठी ही वीज एका मिनिटात सुरू करता येते. आवश्यकता नसल्यास ती लगेच बंद देखील करता येते. आज जे करार झाले आहेत, ते ऐतिहासिक आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यापूर्वी कुठेही झाली नसल्याचे, फडणवीसांनी सांगितले आहे.
'ते' आम्ही करून दाखवले : महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. हे मी सातत्याने सांगत होतो. आता तर 'एफडीआय'चे आकडेच जाहीर झाले आहेत. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर १ वर पोहचला आहे. गुजरात २०२०-२१ मध्ये विदेशी गुंतवणुकीत एक नंबरवर होता, तर कर्नाटक २०२१-२२ मध्ये पहिल्या क्रमांकावर होता. आता २०२२-२३ मध्ये आमचे सरकार आले आहे. आता महाराष्ट्र नंबर १ वर आहे. जे यापूर्वी महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात गेले असे म्हणत होते, त्यांनी तोंडे आता बंद केली पाहिजेत. ते जे करू शकले नाहीत ते आम्ही करून दाखवले, असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.
हेही वाचा: