मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. कामकाजाचा पहिलाच दिवस विधान परिषदेच्या उपसभापतींच्या पदामुळे वादाचा राहिला. अजित पवार गट सत्तेत सामील झाला आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे (उबाठा) यांची शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. दरम्यान नीलम गोऱ्हे यांच्या पदावर विरोधकांनी आक्षेप घेत सभात्याग केला.
उपसभातीच्या पदावरुन वाद : अजित पवार यांनी सत्तेत सहभाग घेतल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाल्याने सत्ताधारी आमदारांची संख्या मोठी झाली आहे. तरीही विधिमंडळात विरोधकांचे पारडे जड ठरले. सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडे अनेक मुद्दे आहेत. अशात उपसभापती नीलम गोऱ्हे ह्या उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात सामील झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पदावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला. विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होताच शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी नीलम गोऱ्हे यांच्या पदाचा मुद्दा उपस्थित केला.
उपसभापतींचे उत्तर : जयंत पाटील यांच्या आक्षेपाला विरोधकांनी साथ दिली आणि सभागृहात गदारोळ सुरू झाला. दरम्यान विरोधकांच्या प्रश्नावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उत्तर दिले. विरोधकांना जर एखाद्या गोष्टीवर आक्षेप असेल, तर त्यांनी ती चर्चा गटाने त्यांच्या बैठकीत करायला हवी होती. परंतु घटनेच्या बैठकीदरम्यान विरोधक अनुपस्थित राहिल्याने हा मुद्दा येथे चर्चेला घेतला जाऊ शकत नाही. उपसभापतींच्या या उत्तराने विरोधक समाधानी झाले नसल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सभात्याग केला.
सभात्याग का केला : याविषयी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले आहे की, नीलम गोऱ्हे यांना अपात्र करण्यासंदर्भात सचिवांकडे पत्र देण्यात आले आहे. परंतु आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच प्रश्नावर शिवसेना उबाठा गटाचे नेते आमदार अनिल परब म्हणाले की, कायद्याप्रमाणे उपसभापती नीलम गोऱ्हे यांना अपात्र करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यांना या पदावर बसू दिले जाऊ नये. याबाबत आमचे एकमत झाले आहे. नैतिक आणि कायदेशीरदृष्ट्या उपसभापतींनी त्या खुर्चीवर बसू नये, या मतावर आम्ही सर्वजण ठाम आहोत, त्यामुळे आम्ही सभात्याग केला.
हेही वाचा -