मुंबई - राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून राज्यभरातून ९०.६६ टक्के इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसीच्या निकालात मोठी वाढ झाली असून तब्बल २५ विषयांचा निकाल हा १०० टक्के इतका लागला आहे. तर ९९ टक्के आणि त्याहून अधिक असा तब्बल ६१ टक्के विषयांचा निकाल लागला आहे. यात १०० टक्के निकाल लागलेल्या विषयांमध्ये प्रामुख्याने पंजाबी, तेलगू, रशियन, या भाषांचा अपवाद वगळता इतर सर्व व्यावसायिक विषयांचा समावेश आहे.
मराठी भाषेचा निकाल हा यंदा वधारला असून ९७.७३ टक्के विद्यार्थी या विषयात उत्तीर्ण झाले आहेत. तर दुसरीकडे इंग्रजीचा आलेख ८९.९६ टक्के इथपर्यंत येऊन थांबला असून हिंदीच्या विषयात मात्र विद्यार्थ्यांनी बरीच आघाडी घेतल्याने यावेळी हिंदी विषयाचा एकूण निकाल हा ९८.०८ टक्के इतका लागला आहे.
शंभर टक्के निकाल लागलेल्या विषयांमध्ये मुंबई विभागातील मल्याळम या विषयासाठी एकच विद्यार्थी परीक्षेला बसला होता. तो उत्तीर्ण झाला असल्याने त्या विषयाचा निकाला १०० टक्के लागला आहे. त्या खालोखाल इंट्रमेटल म्युझीक ८, टुरिझम अँड हॉस्पिटीलीटी १६, मराठी स्टेनोग्राफी ४०, आणि ड्राविंग या विषयात ६६ विद्यार्थी बसले होते. तर सर्वाधिक विद्यार्थी हे पर्यावरण शिक्षण या विषयातील १४ लाख १९ हजार ५४४ इतके होते. त्या खालोखाल व्होकल क्लासिकल म्युझीक या विषयासाठी २ हजार २९८, आणि या खालोखाल डिझाईन अँड कलर या विषयासाठी १ हजार ४४६ विद्यार्थी बसले होते. यातील सर्व विषयांचा निकाल हा १०० टक्के इतका लागला आहे.
दरम्यान, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना श्रेणी विषयांव्यतिरिक्त कोणत्याही विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी करण्यासाठी अथवा उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागाकडे ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयांकडून अर्ज सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे. गुण पडताळणी साठी १७ जुलै ते २७ जुलै तर छायाप्रतीसाठी ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.