मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळामुळे वाऱ्याचा ताशी वेग प्रचंड आहे. दोन दिवसात हे वादळ परतेल आणि मान्सून दाखल होईल. चक्रीवादळामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात जाण्यास बंदी घातल्याचे ते म्हणाले. अरबी समुद्रात आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातकडे कूच केली आहे. सौराष्ट्र मार्गे पाकिस्तानच्या कराची पर्यंत पोहचणार आहे. भारतीय हवामान खात्याने या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्र सरकारनेही खबरदारीचा उपाय म्हणून मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई केली आहे.
6 जण वाहून गेले : समुद्रकिनाऱ्यावर 'एनडीआरएफ'चे जवान तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांकडूनही समुद्रात कोणी उतरू नये, याच्या सूचना दिल्या जात आहेत. जुहू चौपाटीवर समुद्रात उतरलेले आठ जण वाहून गेले. त्यापैकी सहा जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. 'एनडीआरएफ'च्या जवानांनी दोघांना सुखरूप बाहेर काढले. भरतीच्या वेळी पाण्यात उतरल्याने घटना घडल्याचे आपत्कालीन विभागाकडून सांगण्यात आले. राज्यातील दोन एनडीआरएफच्या कंपन्या गुजरातसाठी राखीव ठेवण्यात आल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक, आप्पासो धुळाज यांनी सांगितले आहे.
वादळ 600 कोस दूर : मुंबई हवामान प्रादेशिक विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, बिपरजॉय चक्रीवादळ हे गुजरातच्या दिशेने निघाले आहे. चक्रीवादळ असल्याने समुद्र किनारपट्टी भागात वेगाने वारे वाहत आहेत. महाराष्ट्रापासून 600 कोस हे चक्रीवादळ दूर आहे. मात्र, हवेचा वेग 40 किलोमीटर प्रती ताशी वेगाने वाहत आहेत. चक्रीवादळामुळे महाराष्ट्राला सध्या कोणताही धोका आहे. खबरदारीचा उपाय म्हणून समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. मच्छीमारांना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात हे वादळ महाराष्ट्रातून जाईल आणि मान्सून सुरू होईल, असे कांबळे यांनी सांगितले.
बिपरजॉयचा धोका नाही: आपल्याकडे ताशी ६० किमी पेक्षा जास्त वाऱ्याचा वेग नसणार आहे. त्या कारणाने नागरिकांना घाबरण्याचे काही कारण नाही. राज्याला लाभलेल्या सात कोस्टल जिल्ह्यातील मच्छीमारांना सावधानतेचा इशारा दिला असून सचेत यंत्रणेद्वारे त्यांना त्या पद्धतीचे संदेशही पाठवण्यात आलेले आहेत. सर्व व्यवस्था तयार आहे. १६ जून पर्यंत सर्वांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. एनडीआरएफच्या दोन कंपन्या बिपरजॉय या चक्रीवादळाच्या निमित्ताने पुण्याहून मुंबईला बोलवण्यात आल्या होत्या. परंतु त्या आता गुजरातसाठी राखीव ठेवल्या आहेत. तशाच पद्धतीची परिस्थिती उद्भवली तर त्या कंपन्यांचा वापर केला जाऊ शकतो. परंतु सर्वांत महत्त्वाचे हेच आहे की, नागरिकांनी घाबरू नये व त्याचबरोबर धोक्याचा इशारा ओळखूनच त्या पद्धतीची पावले उचलावी, असेही आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक, आप्पासो धुळाज यांनी सांगितले आहे.
बरेच अपघात हे मानवनिर्मित: राज्यात पुरामुळे मागच्या वर्षी २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर रोड अपघात असतील, समुद्रकिनारी, नदीमध्ये पोहायला गेलेली माणसे असतील, झाडे पडून झालेले अपघात असतील, वीज कोसळून झालेले अपघात यामध्ये मृतांची संख्या अधिक आहे. परंतु बरेच अपघात हे मानवनिर्मित असतात. अनेकदा लोकांना सूचना करूनसुद्धा लोक त्या ठिकाणी जात असतात व त्या अपघाताला ते स्वतः जबाबदार ठरत असतात; परंतु यंदा राज्यात मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थेचा पूर्ण आढावा घेतलेला असून राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांना त्या पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
वीज कोसळून बळींची संख्या अधिक: मागच्या वर्षी राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये सर्वांत जास्त वीज कोसळून मृत्यूचे प्रमाण हे विदर्भातील आहे. मागील वर्षी विदर्भात १११ लोकांचा वीज कोसळून बळी गेला आहे. दुसरीकडे मराठवाड्यात वीज कोसळून बळींची संख्या ५८, तर कोकणात १०, उत्तर महाराष्ट्रात ३० व पश्चिम महाराष्ट्रात ८ आहे. हवामान विभागाकडून दिले जाणारे अलर्ट नागरिकांनी वेळोवेळी पहावेत असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. राज्यात सर्वाधिक बळी हे पुरामुळे व त्याचबरोबर वीज अपघातात होतात. मागील वर्षी राज्यात सुमारे ५०२ नागरिकांचे बळी नैसर्गिक आपत्तीत गेले आहेत.
जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त: मागील वर्षी राज्यात पावसाळी आपत्तीमध्ये ५०२ नागरिकांना जीव गमवावा लागला होता. तसेच मागील वर्षी ४ हजार ३४८ प्राण्यांना जीव गमवावा लागला होता. यामध्ये वीज पडून जनावरांचा मृत्यू झाल्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. २६३ जनावरांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. कारण पावसामध्ये माणसांबरोबर मोठ्या प्रमाणात प्राण्यांनाही जीव गमवावा लागत आहे.