मुंबई - राज्यात कुशल मनुष्यबळ निर्माण करून तरुणांना रोजगार, आणि त्यांच्या हाताला काम काम मिळवून देणे, हे आमच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे प्रमुख काम आहे. मात्र आता त्याहीपेक्षा पुढे पाऊल टाकत आम्ही अधिकचे कौशल्य असलेल्या तरुणांना अधिकचे वेतन आणि कौशल्य मिळावे यासाठी लवकरच राज्यात कौशल्य विद्यापीठ सुरू करणार आहोत. यासाठीची कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
आज जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जात असून त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील तरुणांचा किमान वेतन यापेक्षाही त्याचा अधिक विकास कसा होईल, याचाही विचार सुरू झाला आहे. म्हणून राज्यात पहिल्यांदाच कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कार्यवाही सुरू झालेली आहे. त्याचाही संकल्प आम्ही लवकरच पूर्ण करणार आहोत, असेही मंत्री मलिक म्हणाले.
आम्ही मागील काही महिन्यांमध्ये कौशल्य विकासची व उद्योजगकता विकास नाव बदलून आता कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग केले आहे. अनेक बदल सुरू असून त्यातून राज्यातील तरुणांच्या हाताला अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावा, हेच आमचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेच कौशल्य विभागाचे मुख्य काम-
आमच्याकडे आयटीआयमधून अनेक कोर्सेस सुरू आहेत. तर दुसरीकडे "महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळातून अर्धवेळ कोर्सेस सुरू आहेत. या मंडळाचेही नाव नुकतेच बदलले आहे. बाजारातील गरजेनुसार कुशल कामगार आणि निर्माण करणे लोकांना रोजगार निार्मण करू देणे हेच कौशल्य विभागाचे मुख्य काम आहे. याकडे आजपर्यंत गांभिर्याने पाहिले गेले नाही, परंतु आता राज्यातील सरकारी, खासगी संस्थांचे मोठे जाळे या विभागाशी जोडले जात असल्याने तरुणांना रोजगारासाठी मोठा फायदा होईल असेही मलिक म्हणाले.
राज्यात अनेक खासगी संस्थाही कौशल्य विकासची कामे करत आहेत. आता यापुढे प्रत्येक खासगी संस्थांना आम्ही त्यांची नोंदणी करणे बंधनकारक केले असल्याने त्यांना आमच्या विभागाचेही त्यात नाव प्रमाणपत्रांवर येणार आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याचाही विश्वास मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.