मुंबई - कोरोना विषाणूच्या संकटादरम्यान राज्याची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. मिशन बिगिन अंतर्गत राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी महाआघाडी सरकार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत १५ मोठ्या कंपन्यांशी सामंजस्य करार करणार आहे. यामधून ३५ हजार कोटींची गुंतवणूक होणार असून त्याद्वारे सुमारे २४ हजार लोकांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षा महाविकास आघाडी सरकारला आहे.
राज्यात गुंतवणूक वाढवण्याचे प्रयत्न
राज्यात मार्चपासून कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन आहे. जूनपासून त्यामध्ये काही प्रमाणात टप्प्याटप्याने शिथिलथा आणली जात आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत राज्याच्या महसुलावर परिणाम झाला होता. याचदरम्यान सरकारने सुमारे २१ कंपन्यांशी करार केला आहे. त्यामधून राज्यात ५१ हजार कोटींची गुंतवणूक येणार आहे. येत्या जानेवारीपर्यंत आणखी १२ कंपन्यांबरोबर सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. त्यामधून राज्यात १.५० लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यात इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या टेस्ला कंपनीचे नाव आहे.
गुंतवणूकदार कंपन्यांशी सरकारचा करार -
केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बल्क ड्रग्स पार्कमध्ये सुमारे एक हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. काही दिवसांपूर्वी रायगड, महाराष्ट्रात बल्क ड्रग्ज पार्क तयार करण्यास मंत्रिमंडळाला मान्यता मिळाली आहे. सध्याचे सरकार गुंतवणूक करण्यास तयार असलेल्या कंपन्यांशीच करार करीत आहे. ज्यांची जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे किंवा प्रगतीपथावर आहे. त्यांच्याशी करार करण्यास सरकार प्राधान्य देत आहे. गुंतवणुकीत वाढ झाल्याने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातही रोजगार वाढणार असल्याने आत्मनिर्भर योजनेचा महाराष्ट्राला फायदा होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
या कंपन्यांशी होतील करार -
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मित्सुबिशी इलेक्ट्रिक, ब्राइट सिनो, नेट मॅजिक, एसटीटी डेटा सेंटर, कोल्ट डेटा सेंटर, ओरिएंटल ऍरोमेटिक ईटी, एव्हरमिंट लॉजिस्टिक, मालपाणी वेअरहाऊसिंग या कंपन्यांबरोबर सामंजस्य करार केला जाणार आहे.
]
हेही वाचा - कोचिंग क्लासचालकांनी ठोठावला राज ठाकरेंचा दरवाजा
हेही वाचा - धारावीकर एकवटले, पुनर्विकासासाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार