मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक राज्यातले असंख्य क्षेत्रातील उद्योग बंद पडले. यातून लाखो जणांना आपला रोजगार गमवावा लागला. मात्र, अशा स्थितीतही राज्यातील गृह उद्योग, ऑनलाईन शिक्षण, कॅटरिंग, ई-कॉमर्स ऑटोपशन, वेअर हाऊस डिस्टीब्युटर्सशन, पॅकेजिंग इंडस्ट्री, होम डिलेव्हरी, फार्मा इंडस्ट्री आणि आयटी, आयटी हार्डवेअर, एफएमसीजी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मिती करणाऱ्या क्षेत्रात रोजगारांच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असताना हे एक मोठे दिलासादायक चित्र निर्माण होताना दिसत आहे.
दिलासादायक : कोरोनाच्या काळातही राज्यात रोजगार-नोकरीला मिळतेय संधी कौशल्य विकास विभागाने ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन करून तब्बल १७ हजारांहून अधिक जणांना रोजगार मिळवून दिला आहे. राज्याच्या उद्योग विभागाने विविध प्रकारची उत्पादने, सेवा पुरविणाऱ्या नामांकित अशा १६ कंपन्यांसोबत याच दरम्यान करार केले आहेत. या करारामुळे कोरोनाच्या काळातही राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.कोरोना आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे देशभरातील कोट्यवधी नागरिकांचे रोजगार गेलेले असतानाच राज्यात मात्र हे चित्र बदल असल्याचे दिसत आहे. कौशल्य विकास विभागाने केलेल्या नियोजनामुळे राज्यात तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. यात सर्वाधिक रोजगार हे ग्रामीण भागातील तरुणांना मिळाले असल्याची माहिती कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. राज्यात प्रत्येक वर्षी दोन लाख लोकांना प्रशिक्षण देऊन नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहोत. आयटीआयलाही विकसित करायचे असून त्यानंतर खासगी आयटीआयकडे लक्ष दिल्याने त्यातूनही अनेक तरुण रोजगारक्षम तयार होतील, कौशल्य विकास विभागाकडूनच तीन ते पाच लाख रोजगार उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य असल्याचेही मलिक यांनी सांगितले.हेडहंटरचे प्रमुख व रेझुम मॅनेजमेंट कन्सल्टंट प्रा. लिमिटेडचे संचालक गिरीश टिळक म्हणाले की, कोरोनाच्या काळात गृह उद्योगांना फायदा झाला आहे. आयटी, आयटी हार्डवेअर, ई-कॉमर्समध्येही मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच वेअर हाऊस, डिस्ट्रीब्युर्टशन, या क्षेत्रातही नोकऱ्या मिळत असल्याचे चित्र आहे. अनेक गृहउद्योगांमध्ये कंत्राटी भरती केली जात आहेत, तर पॅकेजिंग इंडस्ट्रीलाही चांगले दिवस येत आहेत. शिवाय ई- कॉमर्स ऑटोपेशन कंपन्या आणि फार्मा इंडस्ट्रीमध्येही रोजगार मिळत असून वर्क फ्रॉम होममधूनही अनेकांना रोजगार मिळत असल्याने एक समाधानाची बाब असल्याचे ते म्हणाले.कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे देशात आणि राज्यातही पहिल्यांदाच ऑनलाईन शिक्षण आणि त्यासाठीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. आज किमान काही लाख तरुणांच्या हाताला ऑनलाईन शिक्षणामुळे रेाजगार मिळाला आहे. यात नोकरी करणारे आणि बेरोजगारांचीही समावेश असल्याची माहिती आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ संतोष गायकवाड यांनी दिली.मुंबई आयआयटीमध्ये डिसेंबरमध्ये महिन्यात कॅम्पस मुलाखती झाल्या होत्या. त्यात आयआयटीमधील विविध शाखांमधील अंतिम वर्षात असलेल्या १ हजार १७२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांनी निवड करून त्यातील ११६ विद्यार्थ्यांना मुलाखतीपूर्वीच नोकरी दिली होती. तर दुसरीकडे इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, ईलेक्ट्रोनिक्स आदी क्षेत्रातील कंपन्यांनी ऑनलाईन पद्धतीने कॅम्पस मुलाखतीत निवड केलेल्यांना रुजू करून घेण्यास सुरू केले असल्याची माहिती आयआयटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.राज्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात कॉलेज कॅम्पसमधून निवड करण्यात आली हेाती. त्यापैकी ईलेक्ट्रीकल व्हेईकल, ऑटोमेशन, आयवोटी, रोबोटीक आदी ऑप्टोमिक टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्याना आता बोलावले जात असून अनेकांना ऑनलाईन काम सुरू करण्यासाठीची ऑफरही दिली असल्याची माहिती सचिव, महाराष्ट्र अससोसिएशन ऑफ ट्रैनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर या संस्थेचे सचिव संजय जाधव यांनी दिली.