मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शिवगर्जना अभियानासाठी राज्याभर दौरा करणार आहेत. आज खासदार संजय राऊत कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. विधिमंडळ नाही हे चोरमंडळ आहे. ही बनावट शिवसेना आहे तसेच ते ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे, असे वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यानंतर त्यांच्या विधानावरून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ झाला. दरम्यान, आजचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले. खासदार राऊतांच्या विधानाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत.
संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध - उपमुख्यमंत्री फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संजय राऊत यांच्या विरोधात भावना तीव्र आहेत. कोणी कोणाला चोर मंडळ म्हणत असेल तर घरी गेलेले बरे. राऊतांनी केलेला आरोप हा सत्ता पक्षावर नाही तर विधिमंडळावर केलेला आरोप आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या सारखे मोठे नेते या विधिमंडळ होऊन गेले. देशातील सर्वोच्च विधिमंडळ मंडळ मानले जाते. अधिवेशना दरम्यान विधिमंडळात वेळोवेळी सत्ताधारी - विरोधक भूमिका मांडतात. विधिमंडळावर बोलले तर कारवाई होते. हजारो संजय राऊत विधिमंडळाचा अवमान करतील. सरकार म्हणून काहीही मागणी करणार नाही. व्यक्ती कोणत्याही पक्षाचा असला तरी अपमान खपवून घेणार नाही, यामुळे राऊतांच्या या विधानाचा आम्ही निषेध करतो.
राऊतांना आमच्या ताब्यात द्या- आमदार नितेश राणे
भाजप आमदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करायला हवी, अशी मागणी केली. कारवाई केली गेली नाही तर संजय राऊत यांना आमच्या ताब्यात द्या, आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना समज देऊ, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. संजय राऊत यांच्याकडून वारंवार विधिमंडळाचा अपमान केला जातो. ते स्वतः खासदार असून असे वक्तव्य ते कसे करू शकतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच राज्य सरकारने संजय राऊत यांची सुरक्षा काढून टाकली पाहिजे, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
आदित्य आणि उद्धव ठाकरे चोर का? - आमदार संजय शिरसाठ
संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य पूर्णपणे चुकीचा असून विधिमंडळाचे सदस्य उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील सदस्य आहेत. संजय राऊत बोलत असतील तर त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील चोर आहेत का? असा सवाल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी उपस्थित केला. संजय राऊत हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असतात. मात्र यावेळी त्यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत गंभीर आहे. संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून, त्यांना उपचाराची गरज असल्याचे देखील संजय शिरसाठ यावेळी म्हणाले. तसेच पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत सध्या जामिनावर बाहेर आहेत. मात्र आता ते पुन्हा जेलमध्ये जावे त्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करू, असा इशारा संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांना दिला आहे.
अधिवेशनाचे कामकाज तहकूब: संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचे पडसाद विधानसभा आणि विधान परिषदेत उमटले.संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे विधान परिषदेच्या सदस्यांनी गदारोळ केला. यामुळे दहा मिनिटे विधान परिषद तहकूब करण्यात आली. तर, विधानसभेतही संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे गदारोळ झाल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले.
हक्कभंगाची नोटीस दिली जाऊ शकत नाही - आमदार भास्कर जाधव
सत्ताधाऱ्यांकडून संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा केवळ राजकारण केले जात आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर आणि शिंदे गटाचे आमदार आणि प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांकडे विधिमंडळ अधिनियम 272 अन्वय हक्कभंगाची नोटीस संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला. मात्र आपल्या माहितीनुसार 272 अन्वय नोटीस ही विनंती अर्ज प्रस्तावासाठी दिली जातो. हकभंगाची नोटीस 272 अन्वय अशी दिली जाऊ शकत नाही, असे भास्कर जाधव यांनी सांगितले.
हे सर्व महाराष्ट्रासाठी घातक - अबू आझमी
आमदार अबू आझमी यांनी सांगितले की, सध्या राज्यामध्ये महागाई प्रचंड प्रमाणामध्ये आहे. गॅस, पेट्रोलचे दर वाढलेले आहेत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांच्या मालाला योग्य किंमत भेटत नाही, असे असताना विधानसभेमध्ये नको त्या विषयावर जास्त चर्चा केली जाते व गदारोळ होऊन कामकाज वारंवार स्थगित केले जाते. ह्या कारणास्तव संपूर्ण राज्याच नुकसान होत असून कोणाला काहीही पडलेले नाही, असे त्यांनी म्हटलेले आहे. विधिमंडळात जे काही सुरू आहे ते सर्व महाराष्ट्रासाठी घातक असल्याचे आमदार अबू आझमी म्हणाले आहेत.
राऊतांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत विधिमंडळ हे चोर मंडळ असल्याचे वादग्रस्त विधान केले. सत्ताधारी पक्षाने यावर हरकत घेत, संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव भाजपचे आमदार गटनेते प्रवीण दरेकर यांनी मांडला. राम शिंदे यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिले. तसेच, राऊत यांना अटक करावी अशी मागणी केली. विरोधी पक्षाचे अंबादास दानवे यांनी संजय राऊत यांचे विधान तपासून घ्या, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांची तुलना देशद्रोह्यांशी केली. यावर ही न्याय करावा, अशी मागणी लावून धरली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून चांगलीच जुंपली. सभापती नीलम गोऱ्हे यांनी सुरुवातीला दहा मिनिटांनी नंतर पंधरा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.
सभागृहाला आठ दिवसाची सुट्टी द्या - एकनाथ खडसे
सभागृह किती दिवसासाठी बंद करणार ही माहिती द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली. तसेच संजय राऊत काय बोलले त्याचा तपास व्हावा. कारण, संजय राऊत सभागृहाचे सदस्य नाहीत. तरीही अशा शब्दाचा वापर केला असेल तर तपासून घेऊन निर्णय घ्यावा. असे वाक्य वापरणे योग्य नाही, तसे विधान खरे असेल तर निषेधार्थ आहे. मात्र, सभागृहाचे कामकाज सत्ताधारी होऊ देणार नसतील, तर आठ दिवस सुट्टी द्यावी, अशी मागणी आमदार खडसे यांनी केली. तसेच गोंधळ घालणार असाल, तर तुमचा हक्कभंग आम्ही फेटाळून लावू, आमच्याकडे संख्याबळ आहे, असा सूचक त्यांनी दिला आहे.