मुंबई : राज्यामध्ये इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. या परिक्षेचा निकाल जून महिन्यात वेळेवर म्हणजे 10 जूनपर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून दिले गेले आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप आधी सुरू होता. त्यानंतर राज्यात सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून मोठा संप सुरू केला.
उत्तर पत्रिका तपासणीचे काम : संपामुळे अर्धा कोटी उत्तर पत्रिका तपासणार कोण आणि कशा तपासणार? दहावीचा आणि बारावीचा निकाल वेळेत लागेल का? असा प्रश्न राज्याच्या शासनाच्या समोर देखील होता. त्यामुळे उत्तर पत्रिकांचे ढीग कार्यालयामध्ये साचले होता. परंतु शासकीय कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आठवडाभरात संप मागे घेतला. उत्तर पत्रिका तपासणीचे काम सुरू केले.
शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप : याबाबत कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी आंधळकर यांच्यासोबत संवाद साधला असतात्यांनी देखील सांगितले की, शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप एका आठवड्यातच संपला. तेव्हापासून उत्तर पत्रिकेच्या कामांना सुरुवात झालेली आहे. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वेळेत निकाल लावतील, अशा रीतीने काम करत आहेत.
निकाल वेळेवर जाहीर करण्याचा प्रयत्न : राज्याचे माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना म्हटलेले आहे की, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक निकाल हे वेळेवर जाहीर करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. त्यासाठी जे काही शिक्षण विभागातील संबंधित कर्मचारी आहे. त्यांची मदत आम्हाला मिळत आहे. जूनच्या सुरुवातीला निकाल जाहीर होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
अडचण संपणार : निकाल वेळेवर लागल्यानंतर पुढील विविध महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी तसेच राज्यात आणि राज्याच्या बाहेर विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांना ते सहज आणि सोपे होते. कारण त्यानंतर वेगवेगळे शासकीय दस्तऐवज प्राप्त करणे, उत्पन्नाचा दाखला असेल किंवा जातीचा दाखला असेल किंवा अनेक प्रकारचे शासकीय दस्तऐवज काढण्यासाठी मोठा कालावधी लागतो. परंतु निकाल वेळेवर लागले तर निश्चित विद्यार्थ्यांच्या समोरची अडचण संपणार आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र स्टुडंट विद्यार्थी संघटनेचे विकास शिंदे यांनी दिली.