मुंबई - आज मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाकडून सकारात्मक निर्णय होईल. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. त्यामुळे सर्व समाजाला न्याय मिळेल. विरोधकांनी मराठा-धनगर आरक्षणाचे राजकारण करू नये, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर म्हणाले.
आधीचे सरकार वाईट होते, असे नाही. मात्र, त्यांनी धनगर समाजाला न्याय दिला नाही. राज्यातील भाजप सरकारने मात्र धनगर आरक्षणाबाबत ठोस पावले उचलली आहेत. न्यायालयातही प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. धनगर आरक्षणाची सुरुवात आम्हीच केली आणि समाजाचे भलेही आम्हीच करणार, असे राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसने धनगर आरक्षणाबाबत मोर्चा काढला होता. त्यावेळी समाजातील तरुणांचे जीव वाचवण्यासाठी फडणवीस, पंकजा मुंडे यांच्यासोबत आंदोलकांना भेटलो होतो. त्यावेळी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. मात्र, चळवळीत बोलणे वेगळे आणि संसदीय कार्यपद्धती वेगळी असल्याची जाणीव सत्तेत आल्यानंतर झाली असल्याचे जानकर म्हणाले.
मराठा आरक्षणाप्रमाणे धनगर समाजाचे आरक्षण अडकून राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मात्र, सर्व अहवाल आल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल. त्यानुसार आता टीसचा अहवाल मिळाला आहे. सरकारनेही न्यायालयात अनुकूल प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामुळे भाजपच धनगर समाजाला आरक्षण देणार असल्याचे जानकर म्हणाले.
भाजप सरकारने आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला सामाजिक, शैक्षणिक आरक्षण देणार आहे. राजकीय आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. धनगर समाजासाठी स्वतंत्र बजेट दिले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळीपालन महामंडळाला स्वतः ५० कोटीचा निधी दिला. आता सरकारकडून एक हजार कोटीची तरतूद केली असल्याचे जानकर यांनी सांगितले.