मुंबई Mahadev App Case: अलीकडच्या काळात सतत चर्चेत आणि वादात सापडलेल्या महादेव बुक ॲप संबंधित मुंबई पोलिसांनी प्रथमच गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक कार्यकर्ते याबाबत तक्रार घेऊन कोर्टात गेले होते. कोर्टाच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती, माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे अद्याप या प्रकरणात कोणालाही चौकशीसाठी बोलावले नसून प्राथमिक तपास सुरू असल्याचं देखील चव्हाण यांनी सांगितलं आहे.
माटुंगा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश: 'खिलाडी' नावाचा बेटिंग ॲप चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश बनकर यांनी न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाने माटुंगा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रकाश बनकर यांच्या फिर्यादीवरून माटुंगा पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात सेलेब्रिटींची चौकशी सुरू: प्रकाश बनकर यांनी दावा केला आहे की, आरोपींनी खिलाडी बेटिंग ॲप वापरून सरकार आणि इतर अनेक लोकांची १५ हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. खिलाडी ॲपच्या सहाय्याने आरोपी जुगार आणि इतर खेळ खेळत होते आणि त्यांनी करोडोंची कमाई केली आहे. आता याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान सौरभ चंद्राकर, रवी उप्पल यांच्यावर यापूर्वी छत्तीसगड पोलिसांनी विविध प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या विरुद्ध ईडीने 'मनी लाँड्रिंग'चा गुन्हाही नोंदवला आहे. याबाबत ईडीकडून देशातील वेगवेगळ्या राज्यात सेलेब्रिटींची चौकशी सुरू आहे.
'एफआयआर'मध्ये 32 आरोपींची नावे: 'एफआयआर'मध्ये एकूण 32 जणांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे, अशी माहिती माटुंगा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये पंजाबचे रोहितकुमार मुरगई, दुबईचे कुमार राठी, छत्तीसगडचे शुभम सोनी, छत्तीसगडचे अतुल अग्रवाल, पश्चिम बंगालचे विकास चपरिया, मुंबई माटुंगाचा अमित शर्मा, दुबईचे लाला राठी, छत्तीसगडचे अभिषेक राठी, मुंबईतून खानजम ठक्कर, दिल्लीचा अमित जिंदल जैन, छत्तीसगडचा चंद्र भूषण वर्मा, गुजरातचा अमित मजिठिया, लंडनमधील दिनेश राठी, मुंबईतील छंदर, दुबईतील बेदी राठी, पंजाबचा राजीव राठी, दुबईतील कृष्णा राठी आणि बऱ्याच आरोपींचा समावेश आहे. दरम्यान, मुख्य आरोपी असलेले सौरभ चंद्राकार आणि रवी उप्पल हे दोघेही छत्तीसगडमधील आहेत. मुंबईचा अमित बॉम्बे, लंडनमधील दिनेश खंबाट, दुबईतील चंदर अग्रवाल, मुंबईतील मोहित बर्मन, दुबईतील हेमंत सुद, मुंबईतील गौरव बर्मन, अहमदाबादमधील हरेशभाई कलाभाई चौधरी, दुबईतील भरत चौधरी, दुबईचा अमर राठी, मुंबईचा रणवीर रॉय, मुंबईचा हितेश खुसालनी, मुंबईचा साहील खान आणि सॅम खान, अमृतसरचा राजीव भाठीया, मुंबईतील वसीम कुरेशी, दुबईचा किश लक्ष्मीकांत आणि माटुंगाचा एक अनोळखी इसमाचा यात समावेश आहे. देशभरात अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करूनही अद्याप फरार आहेत.
बेकायदेशीर मालमत्ता जप्त: ईडीने मुंबई, रायपूर आणि कोलकाता यासह अनेक राज्यांमध्ये किमान 39 ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर 2 हजार कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता सापडली. त्यापैकी 417 कोटी जप्त करण्यात आली. जप्त केलेली मालमत्ता आरोपींच्या मालकीची आहे.
हेही वाचा: