मुंबई - गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून मंदीची झळ सोसणाऱ्या मालमत्ता बाजार पेठेचे कंबरडे कोरोना महामारीच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनने पुरते मोडले आहे. लॉकडाऊनचा मोठा फटका या क्षेत्राला बसला आहे. पण आता मात्र या क्षेत्राला उभारी मिळणार आहे. कारण राज्य सरकारने ग्राहकांना आणि त्याबरोबरीने मालमत्ता बाजारपेठेला चालना देणारा निर्णय घेतला आहे. बुधवारी सरकारने मुद्रांक शुल्कात मोठी कपात केल्याने ग्राहक खुश आहेतच, पण मालमत्ता बाजारपेठेतही बऱ्याच दिवसांनी उत्साह निर्माण झाला आहे.
मुद्रांक शुल्क कमी झाल्याने आणि ही सवलत निश्चित काळासाठीच असल्याने घर खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे आता नक्की गृहविक्रीत मोठी वाढ होईल, असे म्हणत मालमत्ता बाजारपेठेने या निर्णयाचे जोरदार स्वागत करत सरकारचे आभार मानले आहेत.
घर खरेदीविक्रीसाठी राज्यात 5 टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाते. मुद्रांक शुल्क हा सरकारच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. त्यातही मुंबईतून सरकारला मुद्रांक शुल्कातून सर्वाधिक महसूल मिळतो. अशावेळी कोरोना-लॉकडाऊनच्या काळात मुद्रांक शुल्क कमी करण्याची बिल्डरकडून सातत्याने मागणी होत होती. पण लॉकडाऊनमध्ये सरकारचाही महसूल खूप मोठ्या प्रमाणावर बुडाला असताना येणाऱ्या महसुलावर सरकार पाणी सोडेल का? हा प्रश्न होता. सरकारने मात्र ग्राहक आणि मालमत्ता बाजारपेठ यांना प्राधान्य देत हा धाडसी निर्णय घेतल्याचे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या हाऊसिंग/रेराने म्हटले आहे. या निर्णयासंदर्भात कमिटीचे अध्यक्ष आंनद गुप्ता यांनी सरकारचे आभार मानले आहेत.
२ ते ३ टक्क्यांनी मुद्रांक शुल्कात कपात-
मालमत्ता बाजारपेठ गेल्या सहा महिन्यांत मोठ्या मंदीला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी सरकारने थेट 2 ते 3 टक्क्यांनी मुद्रांक शुल्क कमी केल्याने ही ग्राहकांना दिलासादायक बाब आहे. महामारीचा काळ असल्याने ही कपात करण्यात आली आहे. यानंतर कधी मुद्रांक शुल्कात कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ज्या निश्चित काळासाठी ही सवलत देण्यात आली आहे, त्या वेळेत घरखरेदी करणे अत्यंत योग्य ठरेल असेही गुप्ता यांनी सांगितले आहे.
सरकारच्या निर्णयानुसार 1 सप्टेंबर ते 31 सप्टेंबर 2020 पर्यंत 5 टक्क्यांवरून 2 टक्के मुद्रांक शुल्क करण्यात आले आहे. तर 1 जानेवारी ते 31मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क 5 टक्क्यांवरून 3 टक्के करण्यात आली आहे. म्हणजेचे 31 डिसेंबरपर्यंत 3 टक्क्यांनी तर जानेवारी 2021 पासून 31 मार्च 2021पर्यंत 2 टक्क्यांनी मुद्रांक शुल्क कमी करण्यात आले आहे. ही कपात खूप मोठी आणि दिलासादायक आहे. 1 सप्टेंबरपासून जे कुणी घर खरेदी करेल त्याला मोठी सूट मुद्रांक शुल्कावर मिळणार आहे. एखादा ग्राहक 1 कोटीचे घर खरेदी करेल त्याला आज 5 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागेल, तिथे 1 सप्टेंबरला 1 कोटीचे घर खरेदी करणाऱ्याला 5 ऐवजी केवळ 2 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. तर 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 पर्यंत 1 कोटीच्या घरासाठी 5 लाखांऐवजी 3 लाख रुपये मुद्रांक शुल्क आकारले जाईल.
हक्काच्या घराचे स्वप्न स्वस्तात पूर्ण होणार
घर खरेदी-विक्रीत मोठी घट झाली आहे. पण आता मात्र या सवलतीमुळे घर खरेदी-विक्रीत वाढ होईल अशी आशा क्रेडायचे-एमसीएचआय अध्यक्ष नयन शहा यांनी व्यक्त केली आहे. भारतीय ग्राहकांची मानसिकता पाहता सणांच्या काळात गृह खरेदीसारखी महत्वाची खरेदी केली जाते. त्यानुसार आता गृहखरेदीचा सर्वात मोठा मुहूर्त दसरा आणि पाडवा जवळ आला आहे. अशात ही सवलत दिल्याने नक्कीच विक्री वाढेल आणि ग्राहकांचेही हक्काच्या घराचे स्वप्न स्वस्तात पूर्ण होणार असल्याचे ही शहा म्हणाले.