मुंबई - इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, या मुद्द्यावर अधिवेशनादरम्यान विधानसभेत गदारोळ झाला. या गदारोळात भारतीय जनता पक्षाचे 12 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले. या निलंबनानंतर तालिका अध्यक्ष असल्याने भास्कर जाधव यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी दिली जात असल्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेत सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणाऱ्या धमकीमुळे भास्कर जाधव यांना सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी विधानसभेत केली होती. तर या मागणीनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भास्कर जाधव यांना सुरक्षा दिली जाणार असल्याचे सांगितले.
मला सुरक्षेची गरज नाही - जाधव
आमदार म्हणून सामाजिक जीवनात काम करत असताना अनेक उतार-चढाव राजकीय जीवनात आपण पाहिलेले आहेत. हे उतार-चढाव होत असताना, राज्य सरकारने नेहमीच मला सुरक्षा पुरवली आहे. मात्र, राज्य सरकारने सांगूनही मी कधीही सुरक्षा घेतलेली नाही. त्याचप्रकारे आताही मला सुरक्षा नको, असे भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष असताना सभागृहात मत व्यक्त केले. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता राज्य सरकारला जर, वाटत असेल भास्कर जाधव यांना सुरक्षा दिली गेली पाहिजे. तर, ती सुरक्षा मी घेईल असेही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.
शिवीगाळ केल्याचा प्रकार -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवशेन दोन दिवसांचे आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षपदी तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेना आमदार भास्कर जाधव विराजमान झाले होते. मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या आरक्षणावरुन मांडलेल्या मुद्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकतीचा मुद्दा मांडण्याची संधी मागितली. मात्र, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी ती संधी नाकारल्यामुळे भाजप आमदार आक्रमक झाले. तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांचा माईक हिसकावण्याचा प्रयत्न भाजप आमदांरानी केला. त्यानंतर तालिका अध्यक्षांनी 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले. सभागृह तहकूब केल्यानंतर भाजप आमदार विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिले नाही, म्हणून अध्यक्षांच्या दालनात जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. अखेर तालिका अध्यक्षांना शिवीगाळ आणि त्यांच्यासोबत हमरीतुमरी करुन गैरवर्तन केल्याप्रकरणी 12 आमदारांच्या निलंबनाचा ठराव संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी मांडला. या प्रस्तावाला बहुमताने मंजूर करण्यात आले.
हेही वाचा - विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये नेमकं काय झाल? पाहा व्हिडिओ..