मुंबई - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक नियमावली कठोर करण्यात आली आहे. राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी दिवसा जमावबंदी तर, रात्री संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीवरही निर्बंध लावण्यात आले आहे. यामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक मंदावेल, असे बोलले जात होते. मात्र, मुंबईची रस्ते वाहतूक नेहमीप्रमाणेच होताना दिसत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वर्दळ आहे. त्यामुळे सध्यातरी मुंबईकर राज्य सरकारच्या 'मिशन ब्रेक दि चेन'ला अल्प प्रतिसाद देताना दिसत आहेत.
कोरोनाचे नविन निर्बंध -
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोमवारी ५ एप्रिलपासून रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला असून रात्री संचारबंदी आणि दिवसा जमावबंदी लागू केली जाणार आहे. तसेच आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय घेण्यात आला. या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मात्र, हे निर्बंध लावताना राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावता, कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत.
रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी -
राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोक आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते.
हेही वाचा - मिशन 'ब्रेक दि चेन'.. लॉकडाऊन व निर्बंधाबाबत नियमावली जाहीर, काय राहणार सुरू व काय होणार बंद ?