मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जसे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान आहे. तसेच मराठीच्या भाषेच्या संवर्धनातही त्यांचे योगदान असून त्यांनी दिनांक, तारीख आणि पर्यवेक्षक हे शब्द मराठीला दिले असल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गुरुवारी सांगितले.
हेही वाचा - मराठी राजभाषा दिन : जालन्यातील विद्यार्थिनींनी गायल्या जात्यावरील ओव्या
दहावीपर्यंत राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याच्या संदर्भातील विधेयकावरील चर्चेत बोलताना फडणवीस यांनी सभागृहाला सावरकरांच्या मराठी भाषेच्या योगादानाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, सावरकरांना आपल्या मराठी भाषेवर ही अतोनात प्रेम होते. केसरी वर्तमान पत्रात सावरकर यांनी मराठी भाषेवर विशेष लेख मालिका लिहिली होती. यात त्यांनी इतर भाषेतून मराठीत आलेल्या अनेक शब्दांना पर्यायी शब्द दिले.
मराठीमध्ये फारसी भाषेतून आलेला तारीख या शब्दाला सावरकर यांनी 'दिनांक' असा शब्द पहिल्यांदा वापरला. तसेच नंबर या इंग्रजी शब्दालाही त्यांनी मराठीत 'क्रमांक' हा शब्दा दिला. ब्रिटिशांच्या काळात नगरांच्या कारभारासाठी मुनिसिपल हा शब्द वापरला जात होता, त्या मुनिसिपल शब्दाला ही सावरकरांनी 'नगरपालिका' हा पर्यायी शब्द दिला. देखरेख करणाऱ्या व्यक्तीला सुपरवायझर संबोधण्यात येत होते, मात्र सावरकरांनी प्रमाण भाषेत सुपारवायझर या पदाला पर्यवेक्षक हे नाव दिले, असे फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
मराठी भाषा दिनाच्या मुहूर्तावर मराठी भाषा सक्तीचे विधेयक सभागृहात एकमताने मंजूर होत असल्याची ही ऐतिहासिक घटना असल्याचे सांगत या विधेयकाला विरोधीपक्षाचाही पाठिंबा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा - मराठी भाषा गौरव दिन : आजच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान आहे तरी किती?