मुंबई : मुंबईतील भायखळा येथील सर जे जे रुग्णालयातील डी. एम. पेटीट या १३० वर्ष जुन्या ब्रिटीशकालीन इमारतीखाली भुयार आढळले ( British era tunnel discovered at JJ Hospital) आहे. रुग्णालय परिसरात असलेल्या डी.एम. पेटीट इमारतीमध्ये हे भुयार आढळले आहे. इमारतीत सध्या परिचारिका महाविद्यालय सुरू असून यात पाणी गळतीची तक्रार आली ( During Water Leakage fixing tunnel found) होती. ती पाणी गळती शोधताना अचानक या भुयाराचा शोध लागला. दरम्यान याबाबत पुरातत्व विभाग पुढील आढावा घेत आहे.
भुयार २०० मीटर लांब? : जे.जे रुग्णालयात भुयार आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बुधवारी परिचारिका महाविद्यालयात असलेली पाणी गळतीची तक्रार शोधत रुग्णालय परिसराची पाहणी करत असताना निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरुण राठोड यांना काही ठिकाणी संशयास्पद गोष्टी दिसल्या. त्यांना जमिनीलगत बंदिस्त झडपा दिसल्या. त्यानंतर त्यांनी कुतूहल म्हणून अधिक खोलात जाऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांनी त्या झडपा काढताच थोडी पोकळी असल्याचं जाणवलं. त्यानंतर त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या सहाय्याने पुढील पाहणी करत असताना त्यांना भुयाराचा पत्ता ( British era tunnel at Mumbai Hospital ) लागला. डॉ. अरुण राठोड यांना हे भुयार दिसल्यानंतर त्यांनी लगेचच पुरातत्व विभागाला आणि स्थानिक प्रशासनाला याबाबत माहिती दिली. हे भुयार २०० मीटर लांबीपर्यंत आहे. इमारतीची बांधकाम हे १३० वर्ष जुने असल्यानं हे भुयारही १३० वर्ष जुने असल्याचं सांगण्यात येत आहे. आता पुरातत्व विभाग याबाबत पुढील आढावा घेत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
कुठपासून कुठपर्यंत? : याबाबत बोलताना डॉक्टर अरुण राठोड म्हणाले की, आम्ही पाहणी करत असताना काही विचित्र झडपा आम्हाला दिसल्या. नंतर आम्ही अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली त्या बाजूला केल्या असता आम्हाला या भूयाराचा पत्ता लागला. हे आमच्यासाठी सुद्धा आश्चर्यजनक आहे. १३० वर्ष जुने हे भुयार असेल. ऑर्किओलॉजी डिपार्टमेंट आणि स्थानिक प्रशासनाला या भुयाराची माहिती कळवण्यात आली आहे. हे भुयार डिलिव्हरी वॉर्डपासून ते थेट चिल्ड्रन वॉर्डपर्यंत म्हणजेच डी. एम. पेटीट आणि मोटली बाई या इमारतींना जोडते, असेही डॉक्टर राठोड म्हणाले.
अतिशय प्रसिद्ध रुग्णालय : मुंबईतले सर जे. जे. रुग्णालय म्हणजेच सर जमशेदजी जिजीभॉय रुग्णालय. या रुग्णालयाची इमारत १७७ वर्षांपू्र्वी बांधली गेली. सर जमशेदची जिजीभॉय आणि सर रॉबर्ट ग्रँट यांच्या सहकार्याने ही इमारत बांधण्यात आली होती. त्यासाठी जमशेदजी जिजीभॉ यांनी एक लाखाची देणगी दिली. १५ मे १८४५ रोजी या रुग्णालयाचे लोकार्पण झाले. सर जे.जे रुग्णालयाची वास्तू आणि परिसरातील बऱ्याच भागांमध्ये ब्रिटिशकालीन इमारती आहेत. त्यातच आता सापडलेल्या भुयाराबाबत मुंबई जिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती देण्यात आली आहे.
पूर्वी राजभवनातही सापडले होते भुयार : मुंबईतल्या राजभवनातही २०१६ मध्ये एक ब्रिटीशकालीन भुयार सापडले आहे. हे भुयारही सर्वाशेवर्षे जुने आहे. ते १५ हजार चौरस फूट आहे. तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी भुयाराच्या पूर्वेस असलेल्या प्रवेशद्वाराची भिंत तोडण्याचे आदेश दिले. तेव्हा भुयारात २० फूट उंचीच्या एकूण १३ रूम सापडल्या.