मुंबई Prakash Ambedkar Appeal : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 'इंडिया' आघाडीमध्ये समावेश होण्याची वाट पाहत असलेल्या (Mahavikas Aghadi) आणि दुसरीकडं स्वबळावर लोकसभेच्या 48 जागा लढवण्याचा नारा दिलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी अजूनही नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसतंय. म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्राद्वारे एकत्र येण्याची विनंती केली आहे. (Lok Sabha Election 2024)
...तर 48 जागा स्वबळावर लढणार : राज्यात महाविकास आघाडीमध्ये आणि पर्यायानं इंडिया आघाडीमध्ये समावेश व्हावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्नशील आहेत. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत महाविकास आघाडीमधील काही नेते चर्चा करत असले तरी अद्याप प्रत्यक्षात काहीही निश्चित झालेलं नाही. त्यामुळं एकीकडे आता वाट न पाहता लोकसभेच्या 48 जागा स्वबळावर लढणार असल्याचं आंबेडकर यांनी जाहीर केलं. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांनी पत्रही लिहिलं आहे.
पत्राद्वारे आंबेडकरांनी केलं आवाहन : महाविकास आघाडीच्या नेत्यांना लिहिलेल्या पत्रात आंबेडकर म्हणतात की, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या ३ घटक पक्षांमधील जागा वाटपाबाबत महाराष्ट्रात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. या अटकळींचा कितीही गोंगाट सुरू असला, तरी राज्यातील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीकडून कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नाही.
'इंडिया'समोर ठेवले 'हे' सूत्र : पंतप्रधान मोदींना सत्तेतून बेदखल करण्यासाठी ४८ जागांचं महत्त्व लक्षात घेता, तसेच उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार अशा महत्त्वाच्या राज्यांमध्ये जागा वाटपाबाबत इंडिया आघाडी अंतर्गत असणाऱ्या निर्णयाचा अभाव जाणवत आहे. हे बघता वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीने व्यवहार्य आणि संघर्षमुक्त १२+१२+१२+१२ असे सूत्र २६ डिसेंबर २०२३ रोजी सुचवलं असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. लोकसभेसाठी १२+१२+१२+१२ हे सूत्र आम्ही केवळ महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत समावेशासाठीच नाही तर महाविकास आघाडी अंतर्गत सर्व वाद संपवण्याच्याही दृष्टीने प्रस्तावित केलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
'वंचित'नं दर्शवली ही इच्छा : "१२+१२+१२+१२" फॉर्म्युला हा केवळ नरेंद्र मोदींना हटवण्यासाठी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याची आमची इच्छा आणि स्वारस्य पुन्हा व्यक्त करण्यासाठी नाही. तर जागा वाटपाबद्दल महाविकास आघाडीमधील सर्व मतभेद दूर करण्यासाठीसुद्धा प्रस्तावित करण्यात आला असल्याचा पुनरुच्चार आंबेडकरांनी पत्रात केला आहे. महाविकास आघाडीमधील पक्ष शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आगामी लोकसभा निवडणुका एकत्र आणि समान भागीदार म्हणून समान संख्येने जागांवर लढवाव्यात ही वंचित बहुजन आघाडीची इच्छा आहे, असेही आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांचा आशावाद : उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी आमच्या प्रस्तावित फॉर्म्युलावर गांभीर्याने विचार करावा आणि प्रतिसाद द्यावा, अशी विनंती त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे. संपूर्ण महाराष्ट्र आमच्या १२+१२+१२+१२ च्या प्रस्तावित फॉर्म्युल्याबद्दल तुमच्या अधिकृत भूमिकेची आतुरतेने वाट पाहत आहे. मला मनापासून आशा आहे की, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी विचारविनिमय करून निर्णय घेतले जातील आणि मोदींचा पराभव व्हावा केवळ याला एकमेव आणि एकमेव प्राधान्य दिले जाईल, असा आशावादही प्रकाश आंबेडकरांनी या पत्रातून व्यक्त केला आहे.
हेही वाचा: