मुंबई - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती घरात बसूनच साजरी करा, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे. आंबेडकरी अनुयायांना घरातच बसून बाबसाहेबांना अभिवादन करणे शक्य व्हावे, म्हणून थेट प्रक्षेपणाची विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.
चैत्यभूमी सज्ज -
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी म्हणजे प्रतिवर्षी १४ एप्रिल रोजी चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतात. त्या पार्श्वभूमीवर पुष्ट सजावट, रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती, दिवाबत्ती आदी कामे करण्यात आली आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा पुन्हा वाढलेला धोका पाहता राज्य शासनासह बृहन्मुंबई महानगरपालिका देखील सतर्क व सज्ज झाली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही जयंती दिनी चैत्यभूमी येथे शासकीय मानवंदना व इतर सर्व कार्यक्रम करण्यात येणार आहे. मात्र ते मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होणार आहे.
अनुयायांची कोरोना चाचणी -
मुंबईत कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी गर्दीत न जाणे व लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्वांचे पालन करता यावे, कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून लोकांच्या एकत्र येण्यावर निर्बंध घातले आहेत. चैत्यभूमी येथे दर्शनासाठी येणा-या अनुयायांची चाचणी करण्यात येणार आहे. तसेच निर्जंतुकीकरण, तपासणी आदी कोविड प्रतिबंधात्मक खबरदारी देखील घेण्यात येणार आहे.
थेट प्रक्षेपण -
यंदा शासकीय मानवंदना कार्यक्रमाचे ऑनलाईन व प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, जेणेकरुन अनुयायांसह सर्वांना आपापल्या घरी राहून, स्थानिक स्तरावरुन अभिवादन करता येईल. प्रत्यक्ष चैत्यभूमी येथे न येता, अनुयायांना अभिवादन करणे शक्य व्हावे म्हणून थेट प्रक्षेपणाची ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.