मुंबई: राज्यात होणाऱ्या ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. २ डिसेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. परंतु या संदर्भामध्ये अजून १ दिवस अवधी वाढून द्यावा व अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑफलाईन करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त यूपी एस मदान यांच्याकडे केली आहे.
काय म्हटले आहे पत्रात ? राज्यात ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठीचे उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. तथापि, सर्व्हरच्या समस्येमुळे फार मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करता आलेले नाहीत. अर्ज भरण्याची मुदत उद्या दि २ डिसेंबर रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत हजारो इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्यापासून वंचित राहून निवडणुकीची प्रक्रिया निष्पक्ष होण्यास बाधा येण्याची शक्यता आहे.
ऑफलाईन पद्धतीने अर्ज: आयोगाने उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास परवानगी देण्याचा आदेश, आज तातडीने कार्यालयीन कामकाज सुरु होईपर्यंत द्यावा. आयोगाच्या सर्व्हरमधील समस्येमुळे उमेदवारांना अर्ज भरण्यात झालेली अडचण ध्यानात घेता अर्ज भरण्याची मुदत एक दिवसाने वाढवून दि. ३ डिसेंबर २०२२ पर्यंत करावी.
ऑफलाइन पद्धतीने अर्ज : निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये आता ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. तसेच अशा पद्धतीची परवानगी द्यावी, अशी मागणी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा केली होती.