मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आता विरोधी पक्षनेतेपदी राहण्यास नकार दिला आहे. विरोधी पक्षनेते पद सोडण्याच्या भूमिकेवर अजित पवार ठाम असल्यामुळे पक्षाची कोंडी झाली आहे. त्यामुळे आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. येत्या दोन दिवसात ही बैठक मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षनेते पदासह प्रदेशाध्यक्ष पदाचीही निवड केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुढील दोन दिवसात मुंबईतच बैठक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत अनेक घटना घडत आहेत. पक्षातील काही मंडळी नाराज आहे, तर काही गट उघडपणे सक्रिय झाल्याचे दिसते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच दिल्लीत पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या नवनियुक्त कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. विरोधी पक्षनेतेपदावरून पायउतार होण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली, मात्र राज्याशी संबंधित निर्णयांवर चर्चा राज्यातच करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानुसार यासंदर्भात पुढील दोन दिवसात मुंबईत बैठक होणार आहे.
अजित पवार आपल्या भूमिकेवर ठाम : संविधानिक पदापेक्षा आपण पक्ष विस्ताराच्या कामाला अधिक वाहून घ्यावे. आपल्याला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करावे, पक्ष कार्यात सहभागी करून घ्यावे अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मांडली आहे. शरद पवार यांचे काही कट्टर समर्थक वगळता अजित पवार यांच्या या भूमिकेला पक्षातील अनेक आमदारांनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या भूमिकेनुसार निर्णय घेण्याचे दडपण सुप्रिया सुळे यांच्यावरही आले आहे. आगामी निवडणुका पाहता अजित पवार यांच्या भूमिकेचे स्वागत करून तसा निर्णय घेतला जाण्याची शक्यता पक्षात वर्तवली जात आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीतच याबाबत निर्णय होऊन प्रदेशाध्यक्ष पदाचे नाव निश्चित होईल, असे म्हटले जात होते. मात्र दिल्लीत या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही.
दोन दिवसात ठरणार विरोधी पक्ष नेता : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 17 जुलैपासून मुंबईत सुरू होणार आहे. सुमारे दोन आठवडे हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनापूर्वी होणाऱ्या कामकाज सल्लागार समिती बैठकीसाठी विरोधी पक्ष नेत्यांची आवश्यकता आहे. ही बैठक जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. तत्पूर्वी याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणे गरजेचे आहे. म्हणूनच विधानसभा विरोधी पक्ष नेत्याचे नाव निश्चित करण्यासाठी मुंबईत शुक्रवारी किंवा शनिवारी पाच ज्येष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्षांसह विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदावर शिक्कमोर्तब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी सुत्रांनी माहिती दिली आहे.