मुंबई - पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची पोलिसांमार्फत चौकशी सुरू असताना भाजपच्या चित्रा वाघ दिवसेंदिवस पूजाच्या कुटुंबीयांची बदनामी करत आहेत. सततच्या बदनामीला कंटाळून पीडितेच्या कुटुंबीयांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. तरीही भाजपच्या चित्रा वाघ प्रसारमाध्यमांसमोर दररोज नवीन स्टंटबाजी करत आहेत. या गंभीर प्रकरणी चित्रा वाघ यांच्यावर उच्च न्यायालयात पुराव्यासहीत मानहानीचा दावा ठोकणार आहे, अशी माहिती वकील नितीन माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला शिवसेनेचे मंत्री संजय राठोड कारणीभूत आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी लावून धरली आहे. सोशल माध्यमातून व्हायरल झालेल्या संभाषण क्लिप आणि मंत्र्यांचे फोटो मोठा पुरावा आहे, असे वाघ यांचे म्हणणे आहे. मात्र, भाजपकडून गलिच्छ राजकारणासाठी आमच्या कुटुंबाची बदनामी केली जात आहेत. आमची बदनामी थांबवावी, अन्यथा आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसेल, असा निर्वाणीचा इशारा पुजाच्या आई-वडिलांनी दिला आहे.
आत्महत्या केल्यास जबाबदारी घेणार का?
सध्या प्रकरणाची पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे. तपासात संबंधित व्यक्तीचे नाव देखील पुढे आलेले नाही. तरीही भारतीय जनता पक्षाकडून पीडित कुटुंबाला गलिच्छ राजकारणाचे शिकार बनवले जात आहे, असा वकिल नितीन माने यांचा आरोप आहे. राजकारणामुळे पीडित कुटुंबातील व्यक्तीची यात नाहक बदनामी होत आहे. उद्या त्यांच्या कुटुंबातील कुणी आत्महत्या केल्यास ते जबाबदारी घेणार आहेत का? असा सवालही माने यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका
पीडित कुटुंबातील तीन मुलींचे लग्न होणे अजून बाकी आहे. त्यांच्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण करणाऱ्या चित्रा वाघ यांना हे अधिकार कोणी दिले. आरोप सिद्ध होईपर्यंत फोटो, संभाषण क्लिप व्हायरल करू नये, अशा सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. मात्र, वाघ यांच्याकडून पीडित चव्हाण कुटुंबांची वारंवार मीडियाच्या माध्यमातून बदनामी सुरू आहे. पोलिसांमार्फत घटनेची चौकशी सुरू असताना वाघ यांच्याकडून पीडित मुलीच्या मोबाईलचा वापर केला जातो आहे. मुळात हा मोबाईल वाघ यांच्याकडे आलाच कसा? हे प्रकरण गंभीर असून सर्वोच्च न्यायालयात चित्रा वाघ यांनी केलेले आरोपांचे पुरावे सादर करून रिट याचिका दाखल करणार, असल्याचे माने म्हणाले.
चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करावी
घटनेची पोलिसांमार्फत चौकशी सुरू असताना तेथे जाण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागते. तशी परवानगी वाघ यांनी घेतली होती का? तणावाखाली असलेल्या कुटुंबीयांचे मानसिक संतुलन बिघडविण्याचे काम वाघ करत आहेत. पोलिसांनी यामुळे भाजपच्या नेत्या वाघ यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वकील माने यांनी केली. मुंबई पोलीस महासंचालक यांना यासंदर्भातील निवेदन सोमवारी देणार असल्याचे ते म्हणाले.