मुंबई : आजकाल राजकारण्यांना कंबरेखालच्या टीकेतच जास्त रस असल्याचे दिसते. यात सर्वच पक्षांच्या नेत्यांचा समावेश असून राज्याच्या राजकारणातील टीकेची पातळी खालावल्याची चिंता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
सर्वांनी चिंतन करण्याची गरज : या संदर्भात बोलताना ज्येष्ठ विश्लेषक आनंद गायकवाड म्हणाले की, राज्यातील अनेक पक्षांनी परस्परांवर आजपर्यंत टीकेचे बाण सोडले आहेत. मात्र, टीका करताना राजकारण्यांनी कधीच कमरेखालची भाषा वापरली नाही. सध्या परस्परांवर टीका करताना सर्वच नेते आपले भान सोडताना दिसत आहेत. अशा वेळेस जनतेने त्यांच्याकडे कशा पद्धतीने पाहायचे हा प्रश्न निर्माण होतो.
अससंस्कृत भाषेचा वापर : महाराष्ट्रातील अनेक राजकीय वक्त्यांच्या भाषणाची शैली, भाषेच्या पद्धतीमुळे महाराष्ट्र सुसंस्कृत म्हणून ओळखला जात होता. भारतीय जनता पक्षात एकेकाळी लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या वक्त्यांची परंपरा होती. मात्र, त्यांच्या पक्षातही आता सुसंस्कृतपणे बोलणारे नेते दिसत नाहीत. शिवसेनेमध्ये बाळासाहेबांची शैली आक्रमक होती. मात्र, त्यांनी कधीही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही. सर्वच पक्षातील तरुण, युवा नेत्यांवर किंवा आमदारांवर त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा अंकुश दिसत नाही. त्याच्यामुळे युवा नेते आक्रमक ऐवजी असंस्कृत भाषेचा वापर करत आहेत. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आता हे लक्षात ठेवले पाहिजे. आपण जे पेरतो तेच उगवणार आहे. उद्या आपल्याला जनतेसमोर मत मागण्यासाठी जावे लागणार आहे. याची जाणीव या नेत्यांनी ठेवली पाहिजे. अन्यथा जनताही यांना त्याच पद्धतीने वागवल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी व्यक्त केली.
सर्वच पक्षांची भाषा खालावली : उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर अनेक ठिकाणी त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे आंदोलन केले जात आहे. त्यांचे पुतळे जाळले जात आहेत. मात्र, असे करणाऱ्या भारतीय जनता पक्षाची ही भाषा तितकीशी चांगली नाही, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केले आहे. भारतीय जनता पक्षातील अनेक युवा नेत्यांची भाषा कानाला ऐकावीशी वाटत नाही. त्याचप्रमाणे शिवसेनेचे प्रवक्तेसुद्धा अत्यंत खालच्या पातळीवरील भाषेत नेहमीच बोलत असतात. भाषेचा खालावलेला दर्जा हा केवळ आताच नाही, तर गेल्या काही काळापासून सुरू आहे. त्यामुळे आता राजकारण्यांनी आपली भाषा सुधारणे गरजेचे आहे, असे मत भावसार यांनी व्यक्त केले.