मुंबई - पर्यटन वाढ आणि पर्यटन धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोकण पर्यटन विकास समितीची स्थापना करण्यात आली आहे. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याची माहिती प्रमोद जठार यांनी दिली.
पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणाऱ्या या समितीचे उपाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार असणार आहेत. कोकणचे विभागीय आयुक्त, सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय वनाधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे उपसंचालक, विभागीय उपसंचालक या समितीचे सदस्य असणार आहेत. तर आवश्यकतेनुसार विधानसभा सदस्य, खासदार, पर्यटनाशी संबंधित एनजीओ आणि पर्यटन व्यवसायातील उद्योजक यांनाही सहभागी करून घेतले जाईल.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या ठिकाणी कोकण पर्यटन विकास समिती काम करणार आहे. स्थानिकांना यामुळे रोजगार निर्माण होणार आहे. तर पर्यटकांना मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवस्था उपलब्ध होणार आहे.