मुंबई- कोरोना विषाणू विरोधातील लढाईत मुंबईकर सहकार्य करत आहेत, मात्र काही लोक अनावश्यक रस्त्यावर उतरत आहेत. यामुळे, कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याने इमारती, चाळ परिसर सील करावे लागत आहे. यामुळे, सर्वानाच त्रास होत आहे, हे क्लेशदायक आहे. ही जैविक लढाई लढण्यासाठी आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. अनावश्यक घराबाहेर पडू नका, असे आवाहन पुन्हा एकदा महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना केले आहे.
परळ येथील बेस्ट वसाहतीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यानंतर पालिकेने कोरोनाग्रस्त रुग्ण रहात असलेल्या इमारतीला सील केले आहे. त्यानंतर, महापौरांनी बेस्ट वसाहतीला भेट देऊन कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानत त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे. यावेळी बोलताना बेस्ट ही अत्यावश्यक सेवा आहे. यामधून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि पोलिसांना कामावर आणि घरी सोडण्याचे काम केले जाते. त्यामुळे, बेस्ट कर्मचाऱ्यांचे महापौरांनी आभार मानले आहे.
आज कोरोनाचे रुग्ण सर्वत्र आढळत असल्याने वसाहतीच्या वसाहती कोरोनाबाधित व्हायला लागल्या आहेत. ही लडाई जैविक लढाई आहे, ही लढाई सर्वांची आहे, सार्वजनिक ठिकाणी जाऊन न लढायची लढाई आहे. मी आणि माझे कुटुंब घरामध्ये राहिलो इतका प्रयत्न जरी प्रत्येकाने केला, तर आपण कोरोनाविरुद्धची लढाई सहज जिंकू शकतो, असे महापौरांनी सांगितले. कोरोनाच्या विरोधातील लढाईमध्ये मुंबईकर चांगली साथ देत आहेत. मात्र, काही लोक अनावश्यक रसत्यावर येत आहेत, त्यामुळे त्यांना अटकाव करण्याचे गरजेचे झाले आहे, असेही महापौर म्हणाल्या.
तसेच आज अनेक नागरिक असे आहेत ज्यांच्यामध्ये आधी कोरोनाचे लक्षण दिसत नाहीत, मात्र नंतर ते पॉझिटिव्ह आढळत आहेत. या विषाणूमुळे अख्खे कुटुंब आणि आजूबाजूच्या लोकांवर परिणाम होत असल्याने घराबाहेर पडण्याचे टाळा, घराबाहेर पाडावेच लागले तर सुरक्षित अंतर पाळा, आठवड्यातून एकदाच बाजारात जा, वयोवृद्धांनी घराबाहेर पडू नका, शिंकताना, खोकताना रुमाल वापरा आणि सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
हेही वाचा- मुंबईतील आजाद मैदान पोलीस ठाण्यात 150 तबलिगी सदस्यांविरोधात गुन्हा दाखल