मुंबई- मोदी सरकारने यंदाच्या खरीप हंगामासाठी प्रमुख पिकांच्या किमान आधार भावात अत्यंत कमी वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमांवर पुन्हा एकदा मीठ चोळले आहे. त्यामुळे किसान सभा शेतकऱ्यांवरील या अन्यायाचा तीव्र शब्दात धिक्कार करत असून या विरोधात संघर्षासाठी राज्यभर रस्त्यावर आंदोलन करण्याची घोषणा करत आहे, असे अखिल भारतीय किसान सभेचे महाराष्ट्राचे महासचिव डॉ. अजित नवले यांनी ईटिव्ही भारतशी बोलताना सांगितले.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रमुख पिकांना दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली होती. गेल्या हंगामात आधार भावात यानुसार थोडी वाढही केली होती. पुढेही टप्प्या-टप्प्याने अशीच वाढ करून शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. मात्र, निवडणुका संपताच मोदी सरकारने शेतकऱ्यांना आपला खरा चेहरा दाखवत आधार भावात सातत्याने भरीव वाढ करण्याच्या आपल्या घोषणेला हरताळ फासला आहे.
गेल्या हंगामात दिलेली वाढ व वाढता उत्पादन खर्च पहाता जाहीर केलेले आधार भाव शेतकऱ्यांना आणखी हतबल करणारे ठरले आहेत. शेतकरी नव्या हंगामात पेरणी लागवडीच्या लगबगीत असताना मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या या 'भेटी'मुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या मनोबलाचे आणखी खच्चीकरण झाले आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने हमी भावात उडदाच्या हमी भावात २००० रुपयांनी, मुगाच्या हमी भावात १४०० रुपयांनी, कापसासाठी ११३० रुपयांनी, मक्यासाठी २७५ रुपयांनी तर भातासाठी २०० रुपयांनी वाढ केली होती. आता निवडणुकांनंतर २०१९-२० च्या हंगामासाठी मात्र आधार भावात उडदासाठी केवळ १०० रुपये, मुगासाठी ७५ रुपये, कापसासाठी १०५ रुपये, मकासाठी ६० रुपये, भातासाठी केवळ ६५ रुपये वाढ केली आहे. निवडणुका संपताच शेतकऱयांची आम्हाला आता गरज नसल्याचा संदेशच मोदी सरकारने या तुटपुंज्या हमी भावातून देशवासीयांना दिला आहे.
सरकारी धोरणांचा परिणाम असलेल्या शेती संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकरी आपल्या पिकांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत दीडपट हमी भाव मागत आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार आधार भाव ठरविण्यासाठी शेतीमालाचा सर्वंकष उत्पादन खर्च (C२) विचारात घेतला जावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. गत वर्षी सरकारने हमी भावात वाढ केली होती. मात्र, आधार भाव ठरविताना सर्वंकष उत्पादन खर्च (C२) विचारात न घेता केवळ निविष्ठाचा खर्च व कुटुंबाची मजुरीच (A२+FL) विचारात घेतली होती.
यंदाचे जाहीर करण्यात आलेले आधार भाव पाहता आता निविष्ठाचा रास्त खर्च व कुटुंबाची रास्त मजुरीसुद्धा विचारात घेण्यात आलेली नाही हे उघड आहे. शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा हा संतापजनक प्रकार आहे. किसान सभा शेतकऱ्यांवरील या अन्यायाचा तीव्र शब्दात धिक्कार करत असून या विरोधात संघर्षासाठी राज्यभर रस्त्यावर आंदोलन करण्याची घोषणा करत आहे. सरकारने आधार भावात तातडीने दुरुस्ती करून सर्वंकष उत्पादन खर्च विचारात घेत दीडपट आधार भावाची घोषणा करावी, अशी मागणी किसान सभा करत आहे.